बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल
७.४२ कोटी मतदार करणार फैसला; आयोगाचा 'फेक न्यूज'ला कडक इशारा!
पाटणा: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये यंदा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आयोगाने निवडणुकीच्या निकालाची तारीख देखील निश्चित केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा अंतिम निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, बिहारमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने पार पडतील, असा विश्वास निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत. यामध्ये ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा सुमारे १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० मतदार असतील. मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना त्यांची नावे नोंदवता येणार आहेत, तर एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजीच जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर, निवडणुकीच्या काळात प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर (बनावट बातम्यांवर) कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे (Zero Tolerance) निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील. वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील. तसेच, सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
एका बाजूला सत्तेत राहण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत असताना, दुसरीकडे ७.४२ कोटी मतदारांना शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात आपला कौल देता यावा, यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारे हे मतदान आणि त्यानंतर १४ तारखेला लागणारा निकाल बिहारच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहे.
- बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार
- विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतदान होणार
- मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार
- मतमोजणी आणि निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार
- बिहारमध्ये एकूण मतदार ७४.३ दशलक्ष
- बिहार : ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला मतदार तर १७२५ तृतीयपंथी मतदार
- बिहारमध्ये १८ ते १९ वयोगटातील १४.०१ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार
- देशातील सात राज्यांतील आठ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार
- पोटनिवडणुकांसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान तर मतमोजणी आणि निकाल १४ नोव्हेंबरला
- राजस्थानमधील अंता, जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा, पंजाबमधील तरनतारन, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील जुबली हिल्स, मिझोरममधील दंपा आणि ओडिशातील नुआपाडामध्ये पोटनिवडणूक
निवडणूक प्रक्रिया | पहिला टप्पा | दुसरा टप्पा |
निवडणूक अधिसूचना तारीख | १० ऑक्टोबर २०२५ | १३ ऑक्टोबर २०२५ |
नामांकन (अर्ज) करण्याची अंतिम तारीख | १७ ऑक्टोबर २०२५ | २० ऑक्टोबर २०२५ |
नामांकन पत्रांची तपासणी | १८ ऑक्टोबर २०२५ | २१ ऑक्टोबर २०२५ |
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | २० ऑक्टोबर २०२५ | २३ ऑक्टोबर २०२५ |
मतदानाची तारीख | ०६ नोव्हेंबर २०२५ | ११ नोव्हेंबर २०२५ |
मतमोजणी (निकाल) तारीख | १४ नोव्हेंबर २०२५ | १४ नोव्हेंबर २०२५ |