मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दल जागे झाले असून महापालिकेच्या पुढाकाराने आणि भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम या गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने विशेष जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी गॅस सिलेंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील सुमारे २५ लाख ७८ ग्राहकांपर्यंत गॅस सिलेंडरचा सुरक्षित वापर संदर्भात ही जनजागृती करण्यात येणार आहे.
मुंबईतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापरासंदर्भात राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियानाच्या अनुषंगाने भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एक विशेष जनजागृती अभियान घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने मंगळवार ०७ ऑक्टोबर ते शुक्रवार १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधी दरम्यान एक विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मुंबईतील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी गॅस सिलेंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे.
एका विशेष बैठकीला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचे ई. बी. माटले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर भारत पेट्रोलियमचे क्षेत्रिय व्यवस्थापक संदीप पवार, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वरिष्ठ व्यवस्थापिका गीतिका पालीवाल यांच्यासह संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
गॅस सिलेंडर वितरण साखळीत असणारे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, वितरकांच्या स्तरावर कार्यरत असणारी कर्मचारी आणि ग्राहकांच्या घरी सिलेंडर नेऊन देणारे कामगार या सर्वांसाठीही मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्याची सूचना प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी गॅस वितरण कंपन्यांना दिली. या सूचनेनुसार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील, असे दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींद्वारे यावेळी आश्वस्त करण्यात आले. या सर्व ग्राहकांपर्यंत अर्थात सुमारे २५ लाख ७८ ग्राहकांपर्यंत गॅस सिलेंडरचा सुरक्षित वापर करण्याबाबत सविस्तर माहिती ही प्रात्यक्षिकांसह पोहोचावी व ती नियमितपणे देण्यात यावी; अशाही सूचना रवींद्र आंबुलगेकर यांनी या बैठकीदरम्यान केली.
मुंबईतील गॅस सिलिंडर ग्राहकांची संख्या
भारत पेट्रोलियम :
घरगुती : सुमारे १४ लाख ५० हजार
व्यावसायिक वापर :३८ हजार
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी
घरगुती वापर : सुमारे १० लाख ५० हजार
व्यावसायिक वापर : सुमारे ४० हजार
एकूण घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक : सुमारे २५ लाख
एकूण व्यवसायिक सिलिंडर ग्राहक : सुमारे ७८ हजार
एकूण व्यावसायिक आणि घरगुती वापर सिलिंडर ग्राहक : सुमारे २५ लाख ७८ हजार