जीवनगंध : पूनम राणे
श्रीनिवास नावाची चाळ होती. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक तिथे राहत होते. कोणताही उत्सव असो, सारे जर एकजुटीने काम करत होते. कोणताही उत्सव असू दे की सारे जण आनंदाने भारावून जात असत. अंबामातेच्या उत्सवाला एक महिना बाकी होता. पाटील सर चाळीचे अध्यक्ष होते. कोणत्याही नियोजनात त्यांचा हातखंडा होता. चाळीमध्ये त्यांच्या शब्दाला मान होता.
चाळीमध्ये मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मूर्ती किती फूट असावी, डेकोरेशन कोणते असावे, सजावट कोणती करावी, प्रसाद कोणी कोणी आणावा याविषयी चर्चा सुरू होती. कोणी मद्रासी, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लीम असे अनेक जण त्या चाळीत गुण्यागोविंदाने राहत होते. अखेर तो दिवस उगवला. सारेजण दुर्गा मातेच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले. प्रत्येकी चार कुटुंबं मिळून जागरण, पणतीतील तेल, अगरबत्ती याची जबाबदारी नेमून देण्यात आली. आरती, होम हवन, सत्यनारायण पूजा, गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सर्वांनीच सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. स्पीकरचा आवाज मोठा न करता भक्तीगीत, भावगीते लावण्यात आली होती. दुर्गा महात्म्य, मनाच्या श्लोकाचे विवेचन केले जात होते. उत्सवामध्ये केवळ भक्ती आणि श्रद्धेला महत्त्व होते. दुर्गा मातेच्या उत्सवाला नेते मंडळीनी उपस्थिती लावली होती. तेथील वातावरण पाहून ते भारावून गेले होते. आपले मनोगत व्यक्त करताना म्हणत होते, की इथले वातावरण पाहून भारावून गेलो आहे. कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण न होता अत्यंत समर्पक असे नियोजन या चाळीमध्ये झालेले आहे. या चाळीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मला वाटते. या वाक्यावर सर्वांनी “आंबा माता की जय”, असे म्हणत जोरदार टाळ्या वाजवल्या.
अंबामातेच्या मुखावर विलक्षण चैतन्य झळकताना दिसत होते. वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा दुर्गा माता आपल्या भक्तगणांना देत होती. आपणा सर्वांच्या एकजुटीमुळे आपला दुर्गा मातेचा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला, असे म्हणून पाटील सरांनी सर्वांचे आभार मानले.
तात्पर्य : एकजुटीने सर्व कामे सहज सोपी होतात.