Friday, November 14, 2025

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत तसेच अनेक लहान मोठे व्यापारी या भागात वास्तव्यास आहे. मनोरंजनसृष्टीशी संबंधित अनेक लहान मोठे व्यवसाय, चित्रिकरणाची ठिकाणं या पट्ट्यात आहेत. यामुळे अंधेरी ते मालाड या पट्ट्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभरात अनेक तास वाहतूक कोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने पोयसर नदीवर नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

अंधेरी आणि मालाड ही उपनगरातील दोन महत्त्वाची व्यावसायिक आणि व्यापारी केंद्रे आहेत. अंधेरीमध्ये औद्योगिक भाग, कार्यालये आणि व्यावसायिक प्लाझा आहेत, तर मालाड मध्ये आयटी हब्स आणि चित्रपट व जाहिरात क्षेत्रासाठी वापरले जाणारे स्टुडिओ आहेत. यामुळेच अंधेरी ते मालाड या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या झाली आहे. अंधेरी आणि मालाड भौगोलिकदृष्ट्या जवळ असले, तरी पोयसर नदी आणि मालाडची खाडी यांच्या दरम्यान थेट संपर्क नसल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. सध्या लिंक रोडमार्गे या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करण्यासाठी किमान एक तास लागतो.

मुंबई महापालिकेच्या योजनेनुसार मालाड पश्चिमेला लिंक रोडवर असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या मागील भागातून सुरू होऊन अंधेरीच्या मागील रस्त्यापर्यंत पूल बांधण्यात येईल. या पुलाचा बहुतांश भाग हा पोयसर नदीवर असेल. पुलामुळे नागरिकांना मालाडच्या मुख्य भागातून अंधेरीच्या केंद्रापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. प्रवास वेगवान होणार आहे.

महापालिकेच्या पुलाची लांबी सुमारे ४०० मीटर आणि रुंदी ३५ मीटर असेल. पुलावर दोन्ही दिशांना प्रत्येकी दोन मार्गिका अर्थात लेन असतील. पूल कार्यरत झाल्यावर अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करणे शक्य होणार आहे. मंजुरी आणि बांधकामाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा