
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना लावल्याचे समोर आले. हनी इराणींचा ड्रायव्हर नरेश सिंह याने पेट्रोलच्या नावाखाली एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२५ या काळात बारा लाख रुपयांची फसवणूक केली. पेट्रोल भरण्यासाठी पैसे घेऊन नरेश सिंह याने हनी इराणी यांची फसवणूक केली.
प्रकरण नक्की आहे तरी काय ?
हनी इराणी यांनी ड्रायव्हरला गाडीत पेट्रोल भरल्यावर कार्डने पेमेंट करण्याची सूचना केली होती. यासाठी त्यांनी कार्ड पण दिले होते. पण ड्रायव्हरने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. तो गाडीत जेवढे पेट्रोल भरले त्यापेक्षा जास्त पैसे कार्ड स्वाईप करुन पंपवाल्याच्या खात्यात जमा करायचा आणि तिथून परस्पर स्वतःच्या खिशात टाकायचा. या पद्धतीने त्याने तीन वर्षात सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक केली. ड्रायव्हर ३५ लिटर क्षमतेच्या गाडीत ६२ लिटर पेट्रोल भरल्याचे दाखवत होता आणि २७ लिटर पेट्रोलचे पैसे स्वतःसाठी वापरत होता. काही वेळा तर त्याने गाडीत पेट्रोल न भरताच कार्ड स्वाईप करुन पैसे फिरवले होते. अखेर हा प्रकार उघड झाला. यानंतर नरेश सिंह आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्या विरोधात हनी इराणी यांची मॅनेजर दिया भाटिया यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.