विशेष : उमेश कुलकर्णी
चिंपाझींवर संशोधन करणारी लोकविलक्षण संशोधक जेन गुडॉल यांनी नव्वदीत जगाचा निरोप घेतला. चिंपाझींशी त्यांची दोस्ती, त्यांनी चिंपाझी कसे जगतात याविषयी जे जे आपल्या अभ्यासातून मांडलं ते आता पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत पथदर्शी आहे.
सुप्रसिद्ध जेन गुडॉल या चिंपांझी माकडांच्या अभ्यासक आणि जंगली चिंपांझींना नैसर्गिक वातावरणात पाहून त्यांचा अभ्यास करण्यासाठी ओळखल्या जात. जेन गुडॉल इन्स्टिट्यूट ऑफ प्रायमेट्स ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि या संस्थेने चिंपांझींवर मानवाला अगम्य असलेले संशोधन केले आहे. जेन गुडॉल यांना जीव विज्ञान आणि मानव विज्ञान यात सर्वश्रेष्ठ योगदान दिल्याबद्दल ओळखले जाते. पण हा त्यांचा एवढाच अभ्यास नाही. ब्रिटिश प्राणी अभ्यासक आणि मानव विज्ञान अभ्यासक अशा जेन गुडॉल ९१ वर्षांचे जीवन जगल्या आणि त्यातील सर्व वर्षे त्यांनी चिंपांझी या वानराचा अभ्यास करण्यातच घालवली. आपल्या जीवनात चिंपांझी संशोधनात त्या अग्रेसर राहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे जीवन याच एका विषयाला वाहिलेले होते.
३ एप्रिल १९३४ साली इंग्लंडच्या मघ्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या जेन गुडॉल यांनी अगदी लहान वयातच प्राणी जीवनाशी ओळख करून घेतली. लहान होत्या तेव्हाच त्यांच्या मनात जनावरांप्रती विशेषतः पाळीव प्राण्यांविषयी विलक्षण प्रेम होते. पण त्यांच्या जीवनात तो क्षण आला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना लहान खेळणे भेट दिले. पण ते खेळणे पुढे त्यांच्या आयुष्याचा भाग झाले आणि नंतर हे खेळणे राहिले नाही तर खऱ्याखुऱ्या चिंपांझींचा त्यांना सहवास लाभला आणि ते क्षेत्र त्यांच्या जीवनाचे महत्त्वाचे क्षेत्र होऊन बसले. चार वर्षांची असतानाच छोट्या जेनने सर्वप्रथम हे समजून घेण्यात कमालीची आवड दाखवली आणि प्राकृतिक जग कसे काम करते, याचा अभ्यास सुरू झाला. लहानपणी कोंबडी कसे अंडे देते यावर तिने अनेक तास निरीक्षण करून अभ्यास केला आहे. आफ्रिकेत तिची भेट प्रख्यात मानव विज्ञान अभ्यासक आणि जीवाश्म अभ्यासक लुई लीकी यांच्याशी झाली आणि हीच त्यांच्या जीवनातील कलाटणी देणारी भेट ठरली.

लीकी यांनाही एका संशोधकाची गरज होतीच आणि त्यामुळे त्यांनी जेनची निवड केली. मानव विकास शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जेन आणि लीकी यांनी अर्थात वानरांची निवड केली आणि यासाठी आदर्श उमेदवार म्हणून लीकी यांच्या नजरेसमोर जेन हीच होती. १९६० मध्ये टांझानिका सध्या त्याला टांझानिया म्हणतात त्या देशातील गोम्बे नॅशनल पार्क येथे ती गेली आणि तेथे जेन यांनी चिंपांझींच्या जीवनाचा अभ्यास सुरू केला. चिंपांझी यांच्या प्रचंड लाजरेपणामुळे जेन यांच्यापुढे अनेक आव्हाने आली पण त्यांनी या सर्वांवर मात करून चिंपांझी यांच्या जीवनाशी त्या एकरूप झाल्या. गोम्बे येथे आपल्या ६० हून अधिक वर्षापासून चाललेल्या शोध कार्यात जेन यानी चिंपांझीच्या जीवनातील अनेक शोध लावले आणि केवळ त्यांचे निरीक्षण करून चिंपांझी केवळ अवजारांचा उपयोग करण्यात सक्षम नव्हते तर ते तयार करण्यासाठीही सक्षम होते, या शोधापर्यंत जेनचे संशोधन घेऊन गेले. या संशोधनानंतर या प्रचलित समजुतीला तिलांजली मिळाली की केवळ मनुष्यच तेवढा अवजारे करू शकतो. चिंपांझी माकडेही ते करू शकतात असा हा दावा होता. लीकी यांनी हे संशोधन सिद्ध झाल्यावर म्हटले होते की, आता आम्हाला मनुष्याच्या अवजारे तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल पुन्हा परिभाषित करण्याची आवश्यकता आहे. कारण चिंपांझी यानी आम्हाला स्वीकारायला भाग पाडले आहे की चिंपांझी हेही मनुष्याप्रमाणेच काम करू शकतात.
आपल्या संशोधनाच्या पहिली काही वर्षे तरी जेन याना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. कारण चिंपांझी त्यांच्या उपस्थितीबद्दल सतर्क असत. महिनोन महिने चिंपांझींना जेन यांची सवय लावून घ्यावी लागली. चिंपांझींचे सामाजिक जीवनासंबंधी संशोधन सुरू झाले तो काळ विज्ञान आणि इतर शास्त्रांबद्दलचा नवीन दृष्टीकोन स्वीकारण्याचा होता. याच काळात चिंपाझी यांच्या सामाजिक जीवनाबद्दलचे अनेक पैलू विषयक संशोधन सुरू केले जे तोपर्यंत अज्ञात होते. जेनने चिंपांझी कसे उपकरणांचा उपयोग करून आपल्या समस्या सोडवतात याचा अभ्यास केला नाही तर त्यांच्या व्यवहारांचे दस्तऐवजीकरण केले. म्हणजे जे व्यवहार आतापर्यंत केवळ मानवाचे म्हणून समजले जात होते तेच प्राणीही करू शकतात आणि चिंपांझी यांच्यासारखे सस्तन प्राणी तर जास्तच सफाईदारपणे करू शकतात हे जेनच्या अभ्यासातून निष्पन्न झाले. मानवाच्या ज्या भावभावना आहेत म्हणजे एकमेकांच्या गळ्यात गळे घालणे, चुंबन घेणे, सांत्वन करणे आणि समुदायाची भावना या भावना चिंपांझी यांच्याकडेही असतात हे जेन यांनी सिद्ध केले आहे. आता तर हे सर्वमान्य झाले आहे.

जेन यांनी आपल्या संशोधनात नवीन पायंडा पाडला की चिंपांझींना त्यांनी नाव नंबर देण्याऐवजी नाव देण्यास सुरुवात केली. या त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल त्यांच्यावर टीकाही खूप झाली. असे कृत्य म्हणजे विज्ञानाच्या अभ्यासकामध्ये जी निष्पक्ष वृत्ती हवी तिला ठेच पोहोचवणारी आहे असे कित्येक वैज्ञानिकांचे मत होते. पण जेन यांच्या संशोधनाने वैज्ञानिकांना त्यांची ही धारणा बदलायला लावली. जेन यांनी जे पुरावे दिले त्यावरून प्रायमेट्सच्या बाबतीत प्रचलित धारणा बदलण्यास भाग पाडले.
१९७७ मध्ये जेन यांनी आपल्याच नावाची जेन गुडॉल संस्था स्थापन केली आणि विविध पशू तसेच त्यांचे संरक्षण आणि जतन करण्याबाबत अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे चिंपांझी आणि अनेक प्रायमेट्सच्या अवैध शिकारी तसेच त्यांच्याबाबत सामान्यपणे क्रूरता आढळायची त्याला चांगलाच पायबंद बसला. जे प्रायमेट्स कैदेत सापडतात त्यांच्याप्रती आता खूपच सतर्कता आली आहे आणि याचे श्रेय निःसंशयपणे गुडॉल यांच्याकडेच जाते. आपल्यानंतरच्या वर्षात गुडॉल यांनी याच विषयाला व्याख्यान आणि प्रायमेटसचे संरक्षण करणे, त्यांना हिंसेपासून वाचवणे आणि संरक्षणासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे यांचा समावेश होता आणि हेच कार्य गुडॉल यांनी अखेरपर्यंत केले. जेन सर्व जगभर फिरल्या आहेत आणि व्याख्याने देत हिंडल्या आहेत. त्यांना जगभर मान्यता आहे. त्यांच्या संशोधनाला कधीही नोबेल पुरस्कार मिळाला नाही कारण नोबेल पुरस्कार अशा संशोधनाला दिला जात नाही.
कारण या संशोधनात भरपूर कष्ट आणि नवीन माहिती असली तरी जेन यांचे कार्य भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, फिजिऑलॉजी, औषध या नेहमीच्या शास्त्रात तसेच सहित्य आणि शांतता यात गणले गेले नाही. पण यामुळे जेन यांच्या कामाचे महत्त्व कमी होत नाही. त्यांना क्योटो पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार आणि कैक पुरस्कार मिळाले आहेत. जेन गुडॉल यांच्या कामाचे महत्त्व प्रचंड आहे कारण त्यांनी मानवाच्य मित्रांचा अभ्यास केला आहे जो त्यांना या उंचीवर घेऊन गेला आहे. एका प्राण्याबद्दल आत्मीयता असलेल्या मुलीचे रूपांतर एका थोर संशोधिकेत व्हावे आणि तिने चिंपांझी यांचा अभ्यास करावा तसेच त्यांच्याबद्दल प्रचलित समजुतींना धक्का द्यावा किंबहुना त्या मोडीत काढाव्या हे तिचे कार्य कोणत्याही कसोटीवर थोरच ठरते. जेन यांना नंतर गोम्बे पार्क सोडावे लागले कारण तेथे जंगलांवर मानवी अतिक्रमण झाले आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. जे त्यांच्या मित्रांना भोगावे लागले तेच जेन यांना हा नैसर्गिक अधिवास सोडावा लागला. म्हणून त्यांनी आपले लक्ष केवळ चिंपांझीच्या जीवनावर व्याख्याने देणे आणि त्यांच्याप्रती हिंसा होऊ न देणे यावरच लक्ष केंद्रित केले. कसलाही गाजावाजा न करता त्यांनी हे कार्य केले.