
मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ खबरदारीची पावले उचलली आहेत. या सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' (Diethylene Glycol) नावाचे विषारी रसायन आढळल्याचा संशय आहे.
राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपच्या एका विशिष्ट बॅचच्या (Batch No. SR-13) विक्रीवर, साठवणुकीवर आणि वितरणावर महाराष्ट्रात तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.
माहिती देण्यासाठी टोल-फ्री क्रमांक
या संदर्भात कोणतीही माहिती देण्यासाठी, तसेच नागरिकांकडे जर या प्रतिबंधित बॅचचे सिरप आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यासाठी राज्याच्या FDA विभागाने टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केला आहे.
टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्याकडे 'कोल्ड्रिफ' सिरपची Batch No. SR-13 ही आढळल्यास त्यांनी त्वरित वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
पालकांना महत्त्वाचे आवाहन
आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही कफ सिरप देऊ नये. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांना खोकल्याचे सिरप देणे टाळावे. सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरांच्या लेखी सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावेत.
एफडीएने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांना तातडीने या विशिष्ट सिरपचा साठा गोठवण्याचे (freeze करण्याचे) आदेश दिले आहेत. पुढील तपासणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.