मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून मागील तीन वर्षांमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सरासरी तीन हजारांनी वाढ देत ही रक्कम २९ हजार रुपयांवर आणून ठेवली आहे. परंतु आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी जर यापूर्वीप्रमाणेच रक्कम वाढवून दिल्यास ३२ ते ३३ हजार रुपयांपर्यंत ही रक्कम जावू शकते,असे बोलले जात आहे. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे विद्यमान मुख्यमंत्री हे सरासरी तीन हजारांची वाढ देतात की आहे तेवढीच रक्कम कायम ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांन दीपावली २०२५ निमित्त २० टक्के एवढे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे, तसेच इतर कामगार संघटनांकडूनही तसेच कामगारांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांकडे सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, सन २०२० नंतर सानुग्रह अनुदानाच्या रकमेत झपाट्याने वाढ होत १५,५०० रुपयांवरून आता २०२४ पर्यंत ही रक्कम २९,००० रुपयांवर पोहोचली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने यंदाही २९ हजार रुपयांप्रमाणेच सानुग्रह अनुदान देण्याची तयारी दर्शवली असून त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक तरतुदीनुसार, महापालिका प्रशासनाच्यावतीने ही रक्कम प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यास ते यंदा कितीची वाढ देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. यंदा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळयासमोर आहे. त्यामुळे यात वाढ होईल अशी शक्यता असली तरी यापूर्वीप्रमाणे सरासरी तीन हजारांप्रमाणे वाढ मिळते की त्यापेक्षा अधिकार वाढ कि आहेत तेवढीच राखली जाते हे लवकरच स्पष्ट होईल.
दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण १ लाख ४५ हजार कामगारांची पदे आहे, परंतु यातील अनेक पदे रिक्त असून आता केवळ ८५ हजार कामगार,कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कामगार, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून याची लवकरच घोषणा करावी असे म्हटले आहे.