मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ९४ वर्षे होते. काही काळापासून त्या वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संध्या या केवळ व्ही. शांताराम यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्या प्रमुख अभिनेत्री म्हणून झळकल्या. 'पिंजरा', 'झनक झनक पायल बाजे', 'नवरंग', 'अमर भूपाली', 'दो आँखे बारह हाथ' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला विशेष गौरव लाभला. विशेषतः 'पिंजरा'मधील त्यांच्या प्रभावी भूमिकेमुळे त्यांना व्यापक प्रसिद्धी आणि प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.
विशेष म्हणजे, संध्या या मूळतः प्रशिक्षित नृत्यांगना नव्हत्या. मात्र 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटासाठी त्यांनी गोपी कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावले.
१९५२ मध्ये 'अमर भूपाली' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यामध्ये त्यांनी एका गायिकेची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांच्या अभिनय कौशल्य आणि सौन्दर्यामुळे त्या मराठी व हिंदी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करू शकल्या.
२००९ साली 'नवरंग' या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यातही संध्या यांनी विशेष उपस्थिती लावली होती. त्यांच्या कारकिर्दीत 'तीन बत्ती चार रास्ता', 'स्त्री', 'सेहरा', 'अंगारा', 'बिन बिजली', 'लहरीं' आणि 'चंदनाची चोळी अंग जाली' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होता.
शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि चाहत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.