मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिलेआहे. हा पासपोर्ट २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात जप्त करण्यात आला होता. या प्रकारणांनंतर तब्बल ५ वर्षांनी रियाला तिचा पासपोर्ट परत मिळणार आहे.
न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रियाच्या हेतूंवर शंका घेण्याचे काहीही कारण नसल्याचे नमूद करत, तिला पासपोर्ट परत मिळावा असा निर्णय दिला. मात्र, न्यायालयाने काही अटींसह पासपोर्ट परत देण्याचे आदेश दिले आहेत.
कोणत्या अटी घालण्यात आल्या?
प्रत्येक सुनावणीला रियाने हजर राहणे बंधनकारक आहे, विशेष सूट मिळाली तरच अनुपस्थित राहता येईल.
विदेश प्रवासाच्या आधी किमान चार दिवस आधी तिने प्रवासाचा तपशील (फ्लाइट आणि हॉटेल्सची माहिती) सरकारी वकिलांना कळवणे आवश्यक आहे.
तिने मोबाईल क्रमांक तपास संस्थांना द्यावा, मोबाईल सतत सुरू ठेवावा, आणि परदेशातून परतल्यानंतर तात्काळ माहिती द्यावी.
रिया चक्रवर्तीची भावना: "धीर हा माझा पासपोर्ट होता"
न्यायालयाच्या निर्णयानंतर, रियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा पासपोर्ट हातात धरलेला फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. ती म्हणाली “गेल्या पाच वर्षांपासून धीर हाच माझा एकमेव पासपोर्ट होता. अनेक संघर्ष, निरंतर आशा... आज पुन्हा माझ्या हातात माझा पासपोर्ट आहे. माझ्या पुढच्या मी प्रवासासाठी सज्ज आहे! सत्यमेव जयते.”
या पोस्टवर करिश्मा तन्ना, फातिमा सना शेख आणि विक्रांत मेस्सी यांसारख्या कलाकारांनी तिला अभिनंदन केले.
रिया चक्रवर्तीला व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची गरज असून पासपोर्ट जप्त झाल्यामुळे ती संधी गमावत होती. त्यामुळे तिने नवीन अर्ज करून पासपोर्ट परत मागितला होता. तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, रियाने सर्व न्यायालयीन अटींचे पालन केले असून ती पुढेही नियम पाळेल.
जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर सुरू झालेल्या ड्रग्ज चौकशीत, (NCB) ने सप्टेंबर २०२० मध्ये रियाला अटक केली होती. त्यावेळी तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता आणि जामीनाच्या अटींमध्ये पासपोर्ट जमा करण्याची अट होती.
ह्या निर्णयामुळे रियाला पुन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्याला गती मिळण्याची शक्यता आहे.