अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा केल्या. आज तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात केवळ १४६ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले.
आज पुन्हा वेस्ट इंडिजला फलंदाजी करायची संधी मिळाली मात्र तीही त्यांनी गमावली. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव तिसऱ्याच दिवशी संपवला. यासोबतच भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला आहे.
याआधी तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने आपला पहिला डाव ५ बाद ४४८वर घोषित केला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना भारताने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी के. एल. राहुल (१००), युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल (१२५) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी शानदार शतके झळकावत भारताला ४०० च्या पार नेले. कर्णधार शुभमन गिलनेही ५० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा असताना, कर्णधार शुभमन गिलने डाव घोषित करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात भारताच्या रवींद्र जडेजाने ४ विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने ३ आणि कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.