
मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे मुंबईला विद्रुपता निर्माण झाली होती. परंतु आता नवरात्रौत्सवानंतर मुंबईची ही विद्रुपता दूर करण्याचा निर्धार करत महापालिका प्रशासाने बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य हटविण्याची कार्यवाही हाती घेतली. महानगरपालिकेच्या परवाना विभागाने अर्थात अनुज्ञापन खात्याने मागील दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी विशेष मोहिम हाती घेत शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ७ हजार ७८९ इतके बॅनर, फलकांचे साहित्य काढून टाकले.
महापालिकेच्या परवाना विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये प्रामुख्याने उत्सव कालावधीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलेले साहित्य समाविष्ट आहे. परवानगीची मुदत संपल्याने ते काढून टाकण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त अनधिकृतरित्या प्रदर्शित केलेले बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तीपत्रके अशा सर्व बाबींचाही या कार्यवाहीमध्ये समावेश असल्याचे परवाना विभागाने स्पष्ट केले. मात्र, महापालिकेने परवाना दिलेले फलक आणि बॅनर काढले असले तरी अनेक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांचे बॅनर व फलक जैसे थेच आहे. आजही अनेक रस्त्यांवर गणेशोत्सवातील शुभेच्छांचे फलक, बॅनर लागलेले असून ते अद्याप काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेचा परवाना विभागाचे अधिकारी हे सरसकट सर्वंचे बॅनर,फलकांवर कारवाई करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
परवाना विभागान केलेल्या कारवाईतील साहित्य
बॅनर : ५ हजार ५२२,
फलक (बोर्ड) : १ हजार २६६
पोस्टर्स : ५०८
झेंडे ४९३