
पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड, राखीव भूखंड मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्या ठिकाणच्या भुखंडावर मनपा प्रशासनाकडून नामफलक बसवण्यात आलेले नसल्याने सर्व मोकळ्या, राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लवकरात लवकर बसवण्यात यावीत, अशी मागणी समाजसेवक गणेश नारायण वराडे यांनी मुंबई महापालिकेत केली आहे. ज्या ठिकाणी मनपाच्या मोकळ्या व राखीव भूखंडावर फलक लावण्यात आलेले नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुध्दा व्हायला हवी अशी देखील मागणी करण्यात आली.
मनपा एस विभाग हद्दीतील, भांडुप (प.) येथील जनता मार्केट परिसरातील महिंद्र सोसायटीच्या आवारात मनपाचे मोकळे व राखीव भूखंड असून त्यावर कोणत्याही प्रकारचा पालिकेच्या नावाचा फलक लावण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून हा भुखंड पालिकेचा की खासगी विकासकांचा ? असा सवालही गणेश वराडे यांनी केला आहे. हा भुखंड पालिकेच्या अखत्यारीत असेल तर पालिका प्रशासन या भुखंडावर फलक लावण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. असा आरोपही वराडे यांनी केला आहे.
या मनपाच्या मोकळ्या आणि राखीव भुखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लावणे गरजेचे आहे. अन्यथा असले भुखंड भविष्यात गिळंकृत होण्याची किंवा त्या ठिकाणी अतिक्रमणे होण्याची सुध्दा दाट शक्यता असल्याने मोकळ्या आणि राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे फलक त्वरित लावण्यात यावेत अशी मागणी समाजसेवक वराडे यांनी मनपा एस विभागाकडे केली आहे.