
?si=RhQBhU6mD6EC-ZnN राज ठाकरेंची ही संदिग्ध भूमिका का? कारण दोन आहेत. पहिलं म्हणजे जागावाटपाचा तिढा.. ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना एकसारख्याच मराठीबहुल मतदारसंघात इंटरेस्ट आहे. मागच्या वेळेस शिवसेनेने जिंकलेल्या जागा मनसेला हव्या असू शकतात. हा जागावाटपाचा तिढा सुटल्याशिवाय राज ठाकरे युतीला वचन देणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे भाजपसोबतचे संबंध.. राज ठाकरेंचे भाजप आणि त्यांच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध देखील या निर्णयावर परिणाम करत आहेत. भाजपला वाटतंय की ते अजूनही राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यापासून रोखू शकतात. या परिस्थितीत, गमावण्यासारखं उद्धव ठाकरेंकडेच अधिक आहे. राज ठाकरे 'इप्सित हिस्सा' मागणारच आणि तोपर्यंत ते 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेणार. यामुळे युतीची घोषणा होण्याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलंय. 'हिंदी सक्तीच्या विरोधात' ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हालचालींना वेग आला. पण, आता खुद्द महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू झालीये. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी 'मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार' असा विश्वास व्यक्त केला होता. तर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट घोषणा केलीय की, 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार.' यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सारवासारव करत, "कार्यकर्त्यांना जिद्दीने लढायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक पक्ष असा विश्वास देतो," असं म्हटलंय. पण खरं सांगायचं तर, युती होण्यापूर्वीच महत्त्वाच्या पदांवरून असे जाहीर दावे होणं, हे महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी धोक्याची घंटा आहे. युती झालीच तर महापौर कोणाचा? स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे? यावर आता ठाकरेंच्या युतीचं भवितव्य ठरणार आहे. भाजपने एकीकडे 'महायुती' होणार असल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत हे अंतर्गत वाद सुरू आहेत. याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला नक्कीच होणार आहे. ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच जर महापौरपदावरून एवढी रस्सीखेच सुरू असेल, तर भविष्यात जागावाटपाचा आणि इतर पदांचा तिढा कसा सुटणार? अशा उलटसुलट चर्चा आता सुरु आहेत.