मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील मागील १५ वर्षांपासून ही महिला समस्येमुळे त्रस्त होती. या महिलेवर कांदिवलीतील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील डॉक्टरांच्या चमुने या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे मागील १५ वर्षांच्या मोठ्या त्रासातून या महिलेला मुक्ती मिळाली आहे.
रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे ही महिला त्रस्त होती. या समस्येवर सोनोग्राफी आणि एमआरआय आदी चाचण्या करून उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. मधुमेह आणि उच्चरक्तदाब विकार असणाऱ्या या महिला रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते.
हे आव्हान येथील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेलले. ही शस्त्रक्रिया करताना घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे रक्तस्त्राव कमी झाला. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च अधिक होता. मात्र, रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होता. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनामार्फत सांगण्यात आले.