Wednesday, October 1, 2025

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले
मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधले. पण त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने येथील रस्त्याची उंची वाढवून येथील पाणी पंपिंग करून सेंट झेवियर मैदान आणि प्रमोद महाजन उद्यानात भूमिगत टाक्यांमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला. पण ठाकरे सरकारच्या काळात अत्यंत घाईघाईत घेतलेल्या या निर्णयाचे नियोजनच फसल्याचे दिसून येत असून सेंट झेवियर्स मैदानातील भूमिगत टाकीच आता बाहेरील बाजुस स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही टाकीची जागाच बदलून अन्य जागी सम्प पिटचे स्थरांतर करून बांधकाम करण्यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. एफ/ दक्षिण विभागातील सेंट झेवियर मैदानातील साठवण टाकी मधील सम्प पिटचे साठवण टाकीच्या बाहेर स्थलांतर करणे हिंदमाता परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने सेंट झेवियर मैदान येथे यापूर्वी साठवण टाकी बांधण्यात आली आहे. पण साठवण टाकीमधील सम्प पीट वरील झाकणामूळे मैदानातील खेळाडूना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारींची दखल घेत मुंबई फुटबॉल असोसिएशन यांनी सम्प पीट साठवण टाकीच्या बाहेर नेण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सम्प पीट साठवण टाकीच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सल्लागार एस.पी. बागवे यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी सर्वेक्षण करुन अहवाल दिल्यानंतर सम्प पीट साठवण टाकीच्या बाहेर नेण्यासाठीचे काम हाती घेण्याची प्रक्रिया सुरु केली. या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये यासाठी विविध करांसह ७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी सुमती सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. याच कंपनीने हिंदमाता सिनेमा परिसरात होणारी पूरपरिस्थिती कमी करण्यासाठी सेंट झेवियर मैदान येथील साठवण टाकीचा विस्तार करणे व साठवण टाकीवर स्लॅब बांधून आच्छादन करणे आदींचे काम केले होते. या कामांसाठी सुमारे २९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याच ठिकाणचे साठवण टाकीचे बांधकाम सम्प पिट साठवण टाकीच्या बाहेर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हिंदमाता परिसरातील पाणी निचरासाठी आतापर्यंत झालेली उपाययोजना आणि खर्च ब्रिटानिया पंपिंग स्टेशनएकूण पंप : ६ प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर एकूण खर्च: ११५ कोटी रुपये कोणत्या भागाला फायदा : लालबाग,हिंदमाता,काळाचौकी,भायखळा, रे रोड याशिवाय रस्त्यांची उंची वाढवून त्याखाली टाकी बांधणे, सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन मैदानात भूमिगत टाकी बांधणे, यासाठीची जलवाहिनी टाकणे आदींवर सुमारे २००हून अधिक खर्च
Comments
Add Comment