दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे यांचे एकेकाळी एकनिष्ठ समजले जाणारे सिंधुदुर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केला. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून ठाकरे गटाला सातत्याने धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या दिवशीच राजन तेली यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे.
कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म २५ जून १९७० रोजी कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला. त्यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी दशेतूनच सुरू झाला. त्यांनी १९८५ साली कणकवली येथील महाविद्यालयात विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९८८ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये ते शिवसेना शाखाप्रमुख झाले. १९९१ साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली. १९९५ साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले आणि १९९७ साली त्यांच्यावर कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
२००५ साली नारायण राणे यांच्यासोबत ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००७ साली ते विधान परिषद आमदार झाले आणि २०१२ साली त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन पद भूषवले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी त्यांचा पराभव केला. २०१६ साली भाजपने तेली यांच्यावर मोठी जबाबदारी देत त्यांना राज्य सचिव पद दिले आणि २०२० साली ते भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष झाले. २०१९ मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती असताना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे उमेदवार होते. तेव्हा राजन तेली यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पुन्हा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते आणि आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आणखी एक राजकीय वळण घेतले आहे. राजन तेली यांच्या या निर्णयामुळे कोकणातील ठाकरे गटाचे बळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे.