
आज एका चर्चासत्राच्या निमित्ताने जुनी गोष्ट आठवली. अनुवाद विषयक एका चर्चासत्राचे आयोजन आम्ही केले होते. या निमिताने वेगवेगळ्या अनुवादकांशी संधी साधण्याची ती उत्तम संधी होती.
या चर्चासत्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांची कार्यशाळा!
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी कवितांचे प्रत्यक्ष अनुवाद केले. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भाषांतील कविता शोधल्या.त्यावेळी या चर्चासत्रास लेखक-प्रकाशक रामदास भटकळ उपस्थित होते. मुलांचा कार्यशाळेतील सहभाग त्यांना खूप आवडला होता. या घटनेला पंधरा वर्षे तरी नक्की झाली असणार.
आम्ही या दिशेने काम करावे हे त्यांनी मनापासून सुचवले होते. आमच्या मराठी बीएच्या अभ्यासक्रमात भाषांतर विषयक अभ्यास पत्रिकेचा समावेश आम्ही सातत्याने केला. एकाच शैक्षणिक संकुलात विविध भाषांचे एकत्र नांदणे ही खरोखर दुर्मीळ गोष्ट आहे. पण सोमैया विद्याविहार संकुलाला हे वरदान दीर्घकाळ प्राप्त झाले. द्रष्टे विचारवंत म्हणून त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन अतिशय सुस्पष्ट आणि भाषांकरता पूरक होता. तोच दृष्टिकोन आजही सोमैया शैक्षणिक संकुलाने जपला आहे.
भाषांतर आणि अनुवाद होत राहणे याला एकूण वाङ्मयीन पर्यावरणात अतिशय वेगळे महत्त्व आहे. आपल्या जीवनजाणिवा समृद्ध करण्यासाठी मायभाषेसोबतच इतर भाषांतील साहित्य समजून घेणे उपयुक्त ठरते. विश्वभारतीचे स्वप्न पाहणारे रविंद्रनाथ टागोर आणि आपले सानेगुरुजी यांनी भाषांमधले पूल बांधण्याच्या दृष्टीने ठाम पावले उचलली. साने गुरुजींनी भारतीय ऐक्यासाठी आंतरभारतीचे आंदोलन सुरू केले. याचा पुढचा टप्पा म्हणजे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे अनुवाद सुविधा केंद्र उभे राहिले.
चांगल्या साहित्याशी जोडून घेण्यासाठी अनुवाद नि भाषांतराच्या माध्यमातून होणारे आदान प्रदान अतिशय महत्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढल्याच आठवड्यात सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी ऑफ लँग्वेजेस अॅन्ड लिटरेचर’ आणि आंतरभारतीच्या संयुक्त विद्यमाने एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते आहे.
यानिमित्ताने विविध अनुवादक सामाजिक - सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून अनुवादाचे काय महत्व आहे यावर सुसंवाद साधणार आहेत. अनुवादाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय साहित्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी आणि अन्य भाषक वाचकांसाठी ही आनंदपर्वणी ठरणार यात शंका नाही.
-डॉ. वीणा सानेकर