नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. हा हल्ला करणारे दहा पैकी नऊ दहशतवादी सुरक्षा पथकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. अजमल कसाब नावाच्या एका दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले. कसाबने दिलेल्या माहितीमुळे हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे तपास पथकाला मिळाले. यानंतर पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. पण अमेरिकेच्या प्रचंड दबावापोटी तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली. हा धक्कादायक गौप्यस्फोट देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.
हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होण्याच्या सुमारास पी. चिदंबरम यांनी अमेरिकेच्या दबावामुळेच यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधातील कारवाई टाळल्याचे सांगितले. एका मुलाखतीत दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदंबरम यांनी गौप्यस्फोट केला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर काही दिवसांनी पी. चिदंबरम यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर काही दिवसांतच मेरिकेच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री काँडोलिसा राईस भारतात आल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माझी भेट घेतली, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.
राईस यांनी भारताने पाकिस्तानवर कोणतीही लष्करी कारवाई करू नये असे सांगितले. या नंतर काँडोलिसा राईस भारतात आणखी काही जणांना भेटून गेल्या. पुढे भारताने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई टाळली, असे पी. चिदंबरम म्हणाले. भाजपने पी. चिदंबरम यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. पी. चिदंबरम जे काही बोलले ते खूप उशिरा बोलले, या शब्दात भाजपने प्रतिक्रिया दिली.