
बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम भागात सुरू असताना वाद निर्माण झाला. कारवाईदरम्यान एका परप्रांतीय फेरीवाल्याने पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. संबंधित फेरीवाला पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद थांबला. सदर फेरीवाल्याने मराठी भाषेबाबत अपशब्द उच्चारल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित फेरीवाल्याला चोप दिला. बदलापुरात फेरीवाल्यांमुळे रहदारीला त्रास होत असून रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. बहुतांश फेरीवाले हे शहराबाहेरून येत आहेत. त्यांना स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा फायदा मिळत असल्याची चर्चा आहे.
दिवसभर पालिकेची कारवाई सुरू होती. यात अनेक यात अनेक फेरीवाले हटवण्यात आले. ही मोहीम बदलापूर, प. येथे सुरू असताना येथील एका मोठ्या दुकानासमोर एका हातगाडीवाल्याला हातगाडी हटवण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याने हातगाडी हटवली नाही तो कर्मचाऱ्यांची हुज्जत घालू लागला. यावेळी फेरीवाला आणि त्याचे सहकारी पालिका कर्मचाऱ्यांवर धावून गेले तसेच त्यांनी शिवीगाळदेखील केली. या फेरीवाल्याने मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले अशी माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली.
पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेत, संबंधित फेरीवाल्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील सर्व अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहील, असा इशारा गायकवाड यांनी दिला. कारवाईनंतर नगरपालिकेच्या भूमिकेला पाठिंबा देणारे आवाज उमटत आहेत, तर दुसरीकडे फेरीवाल्यांविषयी कडक धोरणामुळे सामाजिक वातावरण आणखी पेट घेण्याची भीती काहींनी व्यक्त केली आहे.