स्तनपानाचे महत्त्व : आईसाठी आणि बाळासाठी

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील


आई व बाळ यांच्यातील नातं हे जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक आहे. या नात्याची पहिली जाणीव बाळाच्या जन्मानंतर स्तनपानातून होते. स्तनपान हे केवळ अन्नपुरवठा नसून आई आणि बाळ यांच्यातील भावनिक, शारीरिक व मानसिक बंध अधिक दृढ करणारा एक नैसर्गिक दुवा आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसेच युनिसेफ यांनी जन्मानंतरचे पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध द्यावे, असा स्पष्ट सल्ला दिलेला आहे.



स्तनपानाचे बाळासाठी फायदे


१. संपूर्ण अन्नपुरवठा : आईच्या दुधात बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे जसे प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे व खनिजे योग्य प्रमाणात असतात. ती बाळाच्या वाढीसाठी व विकासासाठी परिपूर्ण असतात.


२. संरक्षण व रोगप्रतिकारशक्ती : आईच्या दुधात अँटीबॉडीज (प्रतिजैविके) असतात. त्यामुळे बाळाला सर्दी, अतिसार, न्यूमोनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.


३. पचनास सोपे : आईचे दूध सहज पचते व बाळाच्या कोवळ्या पोटाला त्रास देत नाही. कृत्रिम दुधाच्या तुलनेत त्याचे पचन जलद होते.


४. मेंदूचा विकास : स्तनपानामुळे बाळाच्या मेंदूचा व मज्जासंस्थेचा विकास चांगला होतो. अभ्यासांनुसार स्तनपान केलेल्या मुलांची बुद्धिमत्ता थोडी अधिक विकसित असते.


५. भावनिक बंध : आईने कुशीत घेतल्यामुळे बाळाला सुरक्षितता व प्रेमाची जाणीव होते. आईच्या उबदारपणामुळे बाळाचा आत्मविश्वास व मानसिक स्थैर्य वाढते.


६. अतिरिक्त फायदे : स्तनपानामुळे लठ्ठपणा, मधुमेह, ॲलर्जी व बालकांमधील अचानक मृत्यू (Sudden Infant Death Syndrome - SIDS) याचा धोका कमी होतो.
स्तनपानाचे आईसाठी फायदे


१. शरीराला जलद पुनर्बलन : बाळाला दूध पाजल्याने गर्भाशयाचे आकुंचन जलद होते. त्यामुळे प्रसूतीनंतर होणारे रक्तस्राव कमी होतात व आई लवकर बरी होते.


२. गर्भधारणेपासून नैसर्गिक संरक्षण : स्तनपानादरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे काही प्रमाणात गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते (Lactational Amenorrhea Method).


३. कर्करोगापासून संरक्षण : स्तनपानामुळे आईला स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे.


४. वजन नियंत्रण : स्तनपान करताना आईच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ऊर्जेमध्ये परिवर्तित होते. त्यामुळे प्रसूतीनंतरचे वजन कमी होण्यास मदत होते.


५. मानसिक समाधान : बाळाला स्वतःच्या दुधावर वाढताना पाहून आईला आनंद, आत्मविश्वास व मानसिक समाधान मिळते. प्रसूतीनंतर होणारा ताण, नैराश्य (Postpartum depression) कमी होण्यास स्तनपान मदत करते.



सामाजिक व आर्थिक फायदे


स्तनपानामुळे कुटुंबाचा खर्च वाचतो कारण कृत्रिम दूध, बाटल्या, निर्जंतुकीकरण यांचा खर्च टळतो.


आजार कमी झाल्याने वैद्यकीय खर्चात बचत होते.


निरोगी पिढी घडविण्यात स्तनपानाचा मोठा वाटा असतो.



स्तनपानाबाबत गैरसमज व अडचणी


बऱ्याच वेळा स्त्रियांना स्तनपानाबाबत चुकीच्या समजुती असतात. काही जणींना वाटते की त्यांचे दूध कमी आहे, किंवा बाळाला कृत्रिम दूध जास्त पौष्टिक ठरेल; परंतु योग्य मार्गदर्शन, आहार आणि आत्मविश्वास असल्यास जवळपास प्रत्येक आई आपल्या बाळाला पुरेसे दूध पाजू शकते.



निष्कर्ष


स्तनपान हे बाळाचे ‘पहिले हक्काचे अन्न’आहे. ते बाळाला आयुष्यभरासाठी निरोगी, तंदुरुस्त आणि सुरक्षित बनवते. तसेच आईच्या आरोग्याचेही रक्षण करते. म्हणून प्रत्येक आईने जन्मानंतर लगेच व किमान सहा महिने तरी फक्त स्तनपान करावे. त्यानंतरही दोन वर्षांपर्यंत पूरक आहाराबरोबर स्तनपान चालू ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.
स्तनपान हे केवळ एक जैविक क्रिया नसून आई व बाळातील पवित्र नाते, विश्वास व प्रेम यांचा सुंदर प्रवाह आहे.


Comments
Add Comment

कन्या पूजनाचे आधुनिक रूप

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या उपासनेचा एक मोठा पर्व. या नऊ दिवसांमध्ये देवीची

ओंडक्याला मोहोर शिल्पकलेचा

वैशाली गायकवाड कर्तृत्ववान ती राज्ञी : रूपाली भोसले - पाटोळे सुप्रभात मैत्रिणींनो, आज आपण शिल्पकलेतून निर्जीव

कुट्टू एनर्जी बार्स

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे उपवासात किंवा हलक्या-फुलक्या स्नॅक्ससाठी झटपट, पौष्टिक आणि एनर्जीने भरलेला

पंचकोश

मी योगिनी :डॉ. वैशाली दाबके योगविषयक संकल्पनांमध्ये पंचकोश ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. पातंजल

अकाली प्रसूती

गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व नाजूक प्रक्रिया आहे. साधारणतः ३७ ते ४० आठवड्यांदरम्यान

वाक् - संप्रदायिनी

वैशाली गायकवाड अनुदीनी आपल्या दिवाणखान्यात भारदस्त आणि प्रभावी आवाजाने आपले लक्ष वेधून घेणाऱ्या, आकाशवाणी व