मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा यांचे नाव घेतल्याने आज भाजपच्या नेत्यांनी जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या या 'बोलघेवड्या' नेत्याला अक्षरश: सोलून काढले. राऊत यांनी शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा गुजरातमध्ये घ्यावा आणि जय शहांना निमंत्रित करावे, असे उपहासाने सुचवले होते. याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊत यांनी जय शहांचा उल्लेख थांबवावा आणि त्याऐवजी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यासाठी ओवैसी आणि नोमानी यांना निमंत्रित करावे, असा पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना उबाठा गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा गुजरातमध्ये वडोदरा, सुरत किंवा अहमदाबाद येथे घ्यावा. त्यांनी (केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र) जय शहा यांना निमंत्रित करावे."
त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला, "संजय राऊत यांनी प्रत्येक गोष्टीत जय शहा यांचे नाव ओढणे थांबवावे. याऐवजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांना निमंत्रित करावे."
बन यांनी पुढे आरोप केला, "उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात, जेव्हा त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केली, तेव्हा हिंदूंवर हल्ले होत होते, दंगे झाले आणि हिंदूंची घरे जाळली गेली."
"भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिले जात आहे. अहिल्यानगरमध्ये दंगेखोरांवर पोलीस कारवाई करत असताना संजय राऊत यांना इतका राग का यावा? उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसवर अवलंबून आहे आणि त्यांचा पक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची केवळ उप-कंपनी बनला आहे," असे भाजप प्रवक्ते बन यांनी आज भाजपच्या महाराष्ट्र राज्य युनिट कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २ ऑक्टोबरला पावसाचा अंदाज असतानाही दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्क येथे आपला पारंपरिक वार्षिक दसरा मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा आग्रह धरला होता, परंतु नंतर त्यांनी आझाद मैदानाकडे स्थलांतर केले, याकडे सामंजस्याचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
हवामान खात्याने आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही, उद्धव गट शिवाजी पार्कवर भव्य व्यासपीठ, व्हीआयपी आसनव्यवस्था आणि हजारो शिवसैनिकांसाठी तयारी करत आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांना पाऊस असो वा नसो, मेळावा पार पडलाच पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करावा आणि रोख रक्कम पूरग्रस्तांना द्यावी. उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यांचा तीन तासांचा दौरा केला आणि आपले दुःख, वेदना आणि संताप व्यक्त केला. पण ते मुख्यमंत्री असताना मात्र घरी बसून राहिले. तेव्हा कोणतीही कारवाई केली नाही, आता मात्र त्यांना त्यांच्या निष्क्रियतेचे प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे."
उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या वार्षिक मेळाव्याच्या विषयावरही टीका केली. ते म्हणाले की, पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम वैचारिक दिशा निर्देशांसाठी ओळखला जात होता. "पण आता, हा कार्यक्रम इतरांना देशद्रोही म्हणण्याची तीच स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा बोलण्यापुरता मर्यादित राहिला आहे. 'सामना' या सेना मुखपत्रात रोज तीच विलापगाथा सुरू असताना, अशा नाटकी देखाव्यासाठी सामान्य लोकांवर लाखो रुपयांचा बोजा का टाकावा?" असे उपाध्ये म्हणाले.