मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. लाखो हेक्टर शेती वाहून गेली आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मुलांचे शालेय साहित्य वाहून गेले आहे. पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासन आणि अनेक स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. या उपक्रमात आता मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर पण सहभागी झाले आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
याआधी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून मंदिर जाहीर झाली. तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्र्स्टकडून मदत जाहीर झाली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पण पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या संदर्भात ट्रस्टने एक प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट बोर्डाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
पूरग्रस्तांना जाहीर झालेली मदत
लालबागचा राजा : ५० लाख रुपये
गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, शेगाव : १ कोटी ११ लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर : १ कोटी रुपये
साईबाबा मंदिर ट्रस्ट, शिर्डी : १ कोटी रुपये
तुळजापूर मंदिर ट्रस्ट : १ कोटी रुपये
श्री सिद्धिविनायक ट्रस्ट : १० कोटी रुपये