हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष बियांचे सेवन उपयुक्त ठरते. या बिया शरीराला आवश्यक असलेले पोषणद्रव्य, फायबर्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडन्ट्स आणि अन्य महत्वाची तत्त्वे पुरवतात, जे हृदयासाठी हितकारक असतात.
चला जाणून घेऊया कोणत्या बिया हृदयविकार टाळण्यास मदत करू शकतात:
१) भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्त्व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका कमी होतो.
२) सूर्यफूल बिया
या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवण्यास मदत करतात.
३) चिया सिड्स
चिया सिड्स हे फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचा उत्तम स्रोत आहेत. हे बिया नियमित घेतल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी होते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
४) तीळ
तीळ हे हृदयासाठी लाभदायक असून ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. रोज एक चमचा तीळ सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.
५) अळशीच्या बिया
अळशीचे दाणे मॅग्नेशियमने भरलेले असतात आणि त्यात लिनोलिक अॅसिडसुद्धा आढळते. यामुळे कोलेस्टेरॉल पातळी १५% पर्यंत घटते आणि हृदयाचे ठोके नियमित राहतात. त्यामुळे कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो.
६) मेथीचे दाणे
मेथीमध्ये विरघळणारे फायबर्स आणि स्टेरॉइडल सॅपोनिन्स असतात, जे यकृतातील कोलेस्टेरॉलचे उत्पादन थांबवतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर या नैसर्गिक बियांना आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे हृदयविकारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते.