मुंबई : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघातातून रुपाली वाचली आहे. तिला इजा झालेली नाही पण तिच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ज्या मर्सिडीज बेन्झ कारचा अपघात झाला, ती कार रुपालीने काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. गाडी घेतल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्याच कारचा भीषण अपघात झाल्याचं तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितलं आहे. तिने अपघातानंतरचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर "Accident zala bad day " असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबत तिने ब्रोकन हार्टचं इमोजी देखील शेअर केलं आहे.

या अपघातात कारच्या समोरील भागाला मोठं नुकसान झालं असून, बोनेट पूर्णपणे डॅमेज झाले आहे. अपघात नेमका कसा घडला याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते आणि तिच्या आयुष्यातील घडामोडी ती नियमितपणे चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ या मालिकेत ‘सरकार’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिच्यासोबत चेतन वडनेरे आणि कृतिका देव मुख्य भूमिकांमध्ये आहेत.