अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्याजवळ अज्ञातांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला केला. दैत्य नांदूर येथील ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना हाकेंवर हल्ला झाला.
लक्ष्मण हाके यांनी एक फेसबुक पोस्ट करुन शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी शत्रू वाढत असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट करुन २४ तास होत नाहीत तोच लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला झाला. हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या. बोनेटचे नुकसान झाले. सुदैवाने हाकेंना दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. हाकेंचे सहकारी पवन कंकर सावरगाव जवळ जेवण करण्यासाठी थांबले होते, त्यावेळी काही जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कंकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता थेट लक्ष्मण हाके यांच्यावरच हल्ला झाला आहे. हाकेंवर हल्ला करणारे पळून गेले आहेत. पोलीस हल्लेखोरांना शोधत आहेत. मागील काही दिवसांपासून हाकेंना धमकीचे फोन येत आहेत. या संदर्भातली माहिती हाकेंनी प्रसारमाध्यमांना तसेच समर्थकांना दिली आहे. आता त्यांच्यावर हल्ला झाला आहे. पोलिसांनी हल्ला प्रकरणी तपास सुरू केला आहे.