मुंबईभर आपट्याची झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प
मुंबई : दसऱ्याला सोने लुटताना प्रत्येकाने आपल्या दारात आपटा वृक्ष लावून पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे सोने जपावे, असे आवाहन करत महापालिका प्रशासनाने आपट्याच्या वृक्षांचे रोपण मुंबईत करण्याचा निर्धार केला आहे. या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नऊ महिला बचत गटांना नऊ सोन्याची झाडे अर्थात आपटा वृक्ष उद्यान विभागातर्फे भेट देण्यात आली असून ही झाडे लावण्याचा संकल्प करून जी दक्षिण विभागापासून याची सुरुवात केली. जी/दक्षिण विभागातील वरळी येथील आद्य शंकराचार्य उद्यानात नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या हस्ते आध्यात्मिक व आयुर्वेदिक महत्व असलेल्या आपटा व शमी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
आपटा वृक्षाची पाने सोने म्हणुन सर्वजणच लुटतात. परंतु त्याची झाडे कोणीच लावत नाहीत. त्यामुळे हा वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे. जसे महिला वर्ग घरात काटकसर करून बचतीचे सोने करतात, तसेच या दसऱ्याला सोने लुटताना प्रत्येकाने आपल्या दारात आपटा वृक्ष लावून पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे सोने जपावे अशी विनंती करून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन या संदर्भात माहिती देत जी दक्षिण विभागाचे सहायक उद्यान अधिक्षक अविनाश यादव नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नऊ महिला बचत गटांना नऊ सोन्याची झाडे (आपटा वृक्ष) उद्यान विभागातर्फे भेट देण्यात आली.
नवरात्री निमित्त नऊ वर्तुळांमध्ये सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या हस्ते सप्तधान्यांचे बीजारोपण करण्यात आले. पुढील काही दिवसात या बीजारोपणातून धान्य पिकाची वाढ होऊन त्यांच्या कणसातून पक्षांना ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, गहु यासारखे नैसर्गिक खाद्य उपलब्ध होईल,असा विश्वास उद्यान विभागाने व्यक्त केला. नवरात्री निमित्ताने जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्यावतीने महापालिका ग्लोबमिल पॅसेज शाळेतील विद्यार्थ्यांना नवरात्रीला घटस्थापना करण्यामागील आध्यात्मिक-शास्त्रीय कारणे ही प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली. यावेळी स्वतः विद्यार्थ्यांनी सप्तधान्यांचे बीजारोपण करून त्याचे घट आपल्या वर्गात धान्याच्या पुढील वाढीच्या शास्त्रीय निरीक्षणासाठी दर्शनी भागात ठेवले आहेत.