कल्याण : कल्याण, पू. सूचक नाका परिसरातील केडीएमसीच्या शौचालायची दूरवस्था झाली आहे. पंचवीस शौचालये आहेत मात्र त्यातील फक्त एक शौचालय सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. जे शौचालय आहे त्याची पण दूरवस्था झाली आहे.
मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी केडीएमसी पालिकेच्या 'ड' प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने शुक्रवारी वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त दालनाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले. वाघमारे यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. केडीएमसी स्मार्ट सिटीमध्ये येते तरीसुद्धा कल्याणमध्ये शौचालयांची दूरवस्था आहे ही शरमेची बाब असल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या प्रकारामुळे केडीएमसी मुख्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.