बारामती : कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील १२ गावे-वाडीवस्त्यांवरील २ हजार ७३९ ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा उपलब्ध होणार आहे. त्यातील १ हजार ४१८ कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे.
कृषी आकस्मिक निधीतील ६ कोटी ६५ लक्ष रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही करंजे उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. या उपकेंद्रासाठी १८ किलोमीटर ३३ व ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्यात आली आहे. त्यात ११ केव्ही शेंडकरवाडी, मगरवाडी, माळवाडी या तीन कृषी वाहिन्या (फिडर) व सोमय्या, करंजेपूल या दोन गावठाण वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी या परिसरातील गावांचा भार ३३/११ केव्ही निबूत, वडगाव, मुरुम व मुर्टी या उपकेंद्रावर विभागलेला होता.
आता या नवीन करंजे उपकेंद्रामुळे शेंडकरवाडी, गायकवाडमळा, सोरटेवाडी, करंजे, चौधरीवाडी, माळवाडी, भापकरमळा, करंजेपूल, दगडेवस्ती. मगरवाडी, नाईकवाडी, शिवबाबा मंदिर गावे व वाडीवस्त्यांवरील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. त्यात घरगुती १ हजार १०८, वाणिज्य १९५ औद्योगिक १८ व कृषी १ हजार ४१८ अशा २ हजार ७३९ ग्राहकांना लाभ मिळणार आहे. याआधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करंजेपूल ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत २२ लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहे.