फ्लॅटमधील आगीत होरपळून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

उंड्री येथील सोसायटीतील बाराव्या मजल्यावरील दुर्घटना; गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९ जण जखमी


पुणे: पुण्याच्या उंड्री भागातील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीत शुक्रवारी (२६ सप्टेंबर) दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बाराव्या मजल्यावरील एका फ्लॅटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने, घरात एकटा असलेला १५ वर्षीय मुलगा आगीत होरपळून मरण पावला. आग विझवण्याच्या प्रयत्नात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान आणि सात नागरिक असे एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.



आई-वडील कामावर असताना मुलाचा दुर्दैवी अंत


मृत मुलाचे नाव तर्ष कमल खेतान (वय १५), असे आहे. तो उंड्री येथील याच सोसायटीत राहात होता. कोंढवा खुर्द अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दुपारी सुमारे अडीच वाजता जगदंबा भवन मार्गावरील सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.


आगीच्या वेळी तर्ष त्याच्या बेडरूममध्ये एकटा झोपला होता, तर त्याचे आई-वडील कामावर गेले होते. घरात हळूहळू आग वाढत गेली. बाराव्या मजल्यावरील खिडकीतून आगीचे रौद्ररूप आणि धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने सोसायटीतील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.



सिलिंडरचा स्फोट: जवान आणि नागरिक जखमी


घराला आग लागल्याची माहिती मिळताच तर्षच्या आईने तातडीने धाव घेतली. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवान आणि सोसायटीतील काही नागरिक पाण्याची व्यवस्था नसल्याने बारा मजले चालून वर पोहोचले. ते पाणी मारून फ्लॅटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतानाच, स्वयंपाकघरातील दोन गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.


या स्फोटामुळे स्वयंपाकघराची भिंत कोसळली आणि आगीचे लोळ अधिक वेगाने बाहेर आले. आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह सात नागरिक या स्फोटामुळे दूर फेकले जाऊन जखमी झाले.




  • जखमी जवान: विश्वजित मधुकर वाघ आणि पृथ्वीराज परमेश्वर खेडकर (कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र)

  • जखमी नागरिक: डॉ. मृणाल मयंक (४२), योगेश गिरीधर जाधव (४५), झिशान साहिल खान (३५), सुरक्षा रक्षक विनोद मोहन लिमकर (३२) यांच्यासह इतर तीन जण.


अर्ध्या तासात आग आटोक्यात


स्फोटानंतरही अन्य जवानांनी पाण्याचा फवारा चालू ठेवत हिमतीने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आतमध्ये तर्ष गंभीर जखमी अवस्थेत बेडरूममध्ये आढळून आला. जवानांनी त्याला तात्काळ बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जखमी जवान आणि नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच अग्निशमन बंब, एक बीएसेट व्हॅन, दोन टँकर आणि एक उंच शिडीचे वाहन वापरण्यात आले. जवानांनी अर्ध्या तासाच्या कालावधीत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेची नोंद काळेपडळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त होत आहे. आई-वडील कामावर असताना शॉर्ट सर्किटसारख्या कारणाने मुलाचा बळी गेल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत