हापूड : उत्तर प्रदेशमधील हापूड येथे एक तरुण पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार सांगत डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटाचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला. स्कॅनिंगचा रिपोर्ट आला त्यावेळी डॉक्टरांना धक्का बसला. रिपोर्टनुसार रुग्ण तरुणाच्या पोटात अनेक धातूच्या आणि प्लॅस्टिकच्या वस्तू होत्या. हा रिपोर्ट बघताच डॉक्टरांनी रुग्ण तरुणाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
तरुणाचे ऑपरेशन झाले. त्याच्या पोटातून अनेक धातूच्या आणि प्लॅस्टिकच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर औषधांद्वारे उपचार सुरू केले. काही दिवस सक्तीची विश्रांती, सांगितलेला हलका आहार आणि औषधोपचार याद्वारे तरुण बरा होईल असे डॉक्टरांनी त्याच्या नातलगांना सांगितले. त्यावेळी नातलगांना हायसं वाटलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाच्या पोटातून २९ स्टीलचे चमचे आणि १९ प्लॅस्टिकचे टूथब्रश बाहेर काढण्यात आले. हा प्रकार अगदी अनाकलनीय असा होता. यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाच्या नातलगांकडेच त्याच्याविषयी कसून चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती आली. पुढे तरुणाने जरा तब्येत सुधारल्यावर डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यामुळे तर डॉक्टरांची खात्री पटली. पोटात आढळलेल्या वस्तू तिथे कशा पोहोचल्या ? याचा उलगडा झाला.
तरुणाला नशा करण्याची सवय झाली होती. नातलगांनी तो सुधारावा यासाठी त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल केले. या नशामुक्ती केंद्रात अनेकदा वेळेवर जेवण मिळत नव्हते. यामुळे तरुण अस्वस्थ राहू लागला. नशा करता येत नाही, वेळेत जेवण मिळत नाही यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने त्याच अवस्थेत हळू हळू नशामुक्ती केंद्रातील छोट्या वस्तू थेट गिळण्यास सुरुवात केली. तो नकळत ही कृती करत गेला. अवघ्या काही दिवसांत तरुणाने अनेक स्टीलचे चमचे आणि प्लॅस्टिकचे टूथब्रश गिळले. काही दिवसांनी या गिळलेल्या वस्तूंमुळे तब्येत बिघडली आणि तरुणाच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. नशामुक्ती केंद्राच्या प्रशासनाने या अवस्थेत तरुणाला थेट त्याच्या घरी नेऊन सोडले. अखेर तरुणाच्या नातलगांनीच त्याला सोबत घेऊन एका डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि वेळेत उपचार सुरू केले, यामुळे तरुणाचे प्राण वाचले.