
रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ३० तारखेला कोणतेही उद्घाटन होणार नाही.
या विमानतळाच्या नामकरणावरून गेले अनेक महिने राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक आगरी-कोळी समाज, तसेच प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला त्यांच्या नेत्यांचे, दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनही करण्यात आले. विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाईक रॅली काढून जनभावना व्यक्त केल्या होत्या.
राजकीय बैठकांमध्येही या नामकरणावरून वाद रंगले. खासदार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष खासदार कपिल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. बाळ्या मामांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आंदोलन केल्याशिवाय दि.बा. पाटील यांचे नाव लागू शकणार नाही." तर, कपिल पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची संमती दिली आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला "दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असेच नाव दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या उद्घाटनाच्या आणि नामकरणाच्या या गोंधळात नेमकी तारीख आणि नाव काय राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.