
ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचे अंतर काही मिनिटांचे
मुंबई:नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२५ अखेरीस कार्यान्वित होणार असून या विमानतळावर वेगाने पोहोचण्यासाठी ठाण्यातून सहापदरी उन्नत मार्गांची निर्मिती केली जाणार आहे. राज्य सरकारने नुकतीच या मार्गाला मंजुरी दिली आहे. या मार्गामुळे नवी मुंबई विमानतळाकडे मुंबई आणि मुंबई उपनगरांतून येणाऱ्या २० लाख प्रवाशांसाठी रस्त्यांच्या आणि मार्गांच्या सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० लाख प्रवाशांना सेवा देण्याचं नियोजन आहे. यासाठी नवी मुंबई विमानतळ ते मुंबई आणि उपनगरांतील रस्ते, मेट्रो सेवा वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यात दोन महत्त्वाच्या मार्गांचं काम सुरू होणार आहे. नवी मुंबई विमानतळाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता भविष्यात विमानळाकडे येण्यासाठी नव्या मार्गाचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली या भागातून विमानतळाकडे येण्यासाठी वाहतूक कोंडीतून मुक्त मार्ग असावा, यासाठी ठाणे ते नवी मुंबई विमानतळ असा उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. ठाणे ते नवी मुंबई उन्नत महामार्ग हा २५. २ किमीचा असेल. या प्रकल्पासाठी ६,३६३ कोटींच्या खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सिडकोने या उन्नत मागांचा प्रकल्प अहवाल तयार केला असून सार्वजनिक, खासगी भागीदारीतून 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विमानतळ गाठण्यासाठी उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारल्यास वेळ वाचणार, मात्र टोल भरावा लागणार आहे.सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ठाणे ते नवी मुंबई या उन्नत मार्गावर सहा ठिकाणी इंटरचेंज असतील. यामध्ये कोपरी पटणी पूल, घणसोली-ऐरोली खाडीपूल, सायन-पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग, उलवे कोस्टल रोड आणि विक्रोळी ते कोपरखैरणे खाडीपूलाचा समावेश आहे. सध्या नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारे दोन महत्त्वाचे खाडी पूल आहेत. त्यातील पहिला खाडीपूल हा वाशीजवळ आहे. नुकतचं या खाडीपुलाचं विस्तारीकरण करण्यात आलं असून नवे दोन मार्ग या ठिकाणी टाकण्यात आले आहेत. या मार्गावरून कुर्ला, दादर परिसरात जाण्यासाठी मोठी वाहतूक दररोज होते. दुसरा खाडीपूल हा इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन ऐरोलीला जोडण्यात आलाय. मुलुंड ते ऐरोली लिंक रोड अशीही याची ओळख आहे. आता तिसरा खाडीपूल विक्रोळी ते कोपरखैरणे असा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची चर्चा होती, मात्र आता नवी मुंबई विमानतळामुळे या तिसऱ्या खाडीपुलाच्या कामाला गती येणार आहे. सध्या असलेल्या ऐरोलीच्या अलिकडेच विक्रोळी ते कोपरखैरणे असा नवा खाडी पूल उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेनं या मार्गावर असलेल्या घणसोली ते ऐरोलीदरम्यान पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. या नव्या रस्त्यामुळे शीळ फाटा-महापे परिसरातून पूर्व द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी नवा मार्ग येत्या काळात उपलब्ध होईल