नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी
-विनायक बेटावदकर
कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा केला गेला. आता सोमवारपासून नवरात्रोत्सवही त्याच उत्साहात दुर्गाडी किल्ल्यासह शहरातील महत्त्वाच्या भागात साजरा केला जाणार आहे.कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेली अनेक वर्षे धार्मिक परंपरा जपत तेव्हढ्याच उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या काळात दुर्गाडी किल्ला परिसराला जत्रेचे मोठे स्वरूप प्राप्त होते. किल्ल्याच्या पायथ्याशी निरनिराळे स्टॉल लावले जातात, प्रत्यक्ष किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिरात चित्र रूपाने विविध सामाजिक विषय मांडले जाऊन समाज जागृतीचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे या किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जात असते. त्यात धार्मिक विषयांबरोबर सामाजिक विषयांना प्राधान्य दिले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी राज्य स्थापनेच्या काळात कल्याणचा हा दुर्गाडी किल्ला तेव्हढाच महत्वाचा मानला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट देऊन येथूनच मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले जाते. हे लक्षात घेऊन यावर्षी किल्ल्यावरील सजावटीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट चितारण्यात आला आहे.
दुर्गाडी किल्ला आता जुना झाला आहे. अनेक ठिकाणी त्याची पडझड झाली. काही बुरुजही मध्यंतरीच्या काळात ढासळले होते ते नीट करण्यात आले. दुरुस्तीसाठी नेवासा धाटणीचा दगड वापरण्यात आला. किल्ल्यावर असलेले दुर्गादेवीचे मंदिरही आता जुने झाले आहे. त्याचीही रंग-रंगोटी करून डागडुजी करण्यात आली. किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मार्गावर पायथ्यापासून मंदिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली जीवनपट साकारण्यात आला आहे. शिवाय वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहे. ते खरोखरच खूप उद्बोधक आहेत.किल्ल्याच्या पायथ्याशी रत्यावर मोकळ्या जागेत मोठी यात्रा भरते, निरनिराळे स्टॉल लागतात. नागरिकही तेथे मोठ्या संख्येने जमा होतात हे लक्षात घेऊन या भागात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोठेही गर्दीला वाव राहणार नाही याची पोलिसांनी खबरदारी घेतली तर आहेच शिवाय त्यांना कार्यकर्तेही यादृष्टीने सहकार्य करीत आहे.
साधारणपणे उत्सवकाळात गर्दीच्या ठिकाणी नियोजन केले जात असले तरी खड्डेमय मार्गामुळे रस्त्यांचा प्रश्न हा कायम स्वरुपीच अनुत्तरीत राहिला आहे. नवरात्रोत्सवापूर्वी या मार्गावरील खड्डे बुजवण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे शासनाने व उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी महापालिकेला आवाहन केले होते. महापालिकेनेही तसे प्रयत्न केले पण त्यात त्यांना विशेष यश आले नाही. दुर्गाडी चौकातून भिवंडीकडे मुख्य रस्ता जातो. त्याचप्रमाणे पत्रीपूल मार्गानेही एक बायपास या भागातून जात असल्याने कल्याण शहरातील शिवाजी चौक भागातील होणारी गर्दी टाळण्यास त्याची मदत होते.कल्याण शहरात गुजराती समाजही बऱ्यापैकी आहे. त्यांची गरबा नृत्ये पाहण्यासाठी रात्रीला नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब बाहेर पडत असल्याने शहरातील रस्त्यातूनही गर्दी असते. यावर्षी ऐन नवरात्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बंद हॉल, किंवा गोडाऊनमधून गरबा खेळण्याची सोय केल्याचे आढळून आले आहे. कल्याणातील टिळक चौकातील महालक्ष्मी मंदिर, जरीमरी मंदिर, कल्याण पूर्वेतील तिसाईदेवी मंदिर येथे घटस्थापना केली आहे. तेथेही गरबा नृत्ये होतात. अलीकडच्या काळात काही सामाजिक संस्था, कार्यकर्तेही गरबा नृत्यांचे कार्यक्रम आयोजित करतात त्यांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.