रायगड : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असून, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली दिसून येत आहे. मात्र पावसामुळे उत्पादन घटल्याने झेंडूचे दर प्रतिकिलो २०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी असूनही, पूजेसाठी लागणारी फुले खरेदी केली जात आहेत.
गणेशोत्सवात झेंडू फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर आरास व सजावटीसाठी झाला. त्या काळात चांगल्या प्रतीच्या झेंडूचा दर २०० रुपये प्रति किलो होता. त्यानंतर पितृपंधरवड्याच्या काळात फुलांची मागणी घटल्याने दरही घसरले. मात्र नवरात्रोत्सव सुरू होताच, पुन्हा एकदा फुलबाजारात झेंडूची चलती सुरू झाली आहे.
उत्पादन घटले, दर वाढले:
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि कुजलेल्या पिकांमुळे झेंडूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे खराब झाले. परिणामी, बाजारात झेंडूची आवक मर्यादित राहिली असून, दर वाढले आहेत. मागील वर्षी झेंडू प्रतिकिलो १२० ते १५० रुपयांना विकला जात असताना, यावर्षी तो २०० रुपये पार गेला आहे.
बाजारात गर्दी, रस्त्यांवर फुलांचे ढीग :
नवरात्रौत्सवातील पूजाअर्चेसाठी झेंडू अत्यावश्यक मानले जात असल्यामुळे, ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. अलिबागच्या मुख्य बाजारपेठांसह रस्त्यांच्या कडेला देखील झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मांडलेली दिसून येत आहेत. शेतकरीही सणाची ही संधी साधून उपलब्ध फुलांची काढणी करून विक्री करत आहेत.
विक्रेत्यांची प्रतिक्रिया:
"पावसाच्या तडाख्याने झेंडूच्या शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे उत्पादन कमी झालं आणि भाव वाढले. सध्या किरकोळ विक्रीत झेंडू २०० रुपये प्रति किलोने विकत आहोत," अशी माहिती झेंडू विक्रेते यांनी दिली.
सणाच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना असलेली परंपरागत मागणी लक्षात घेता, दरवाढ असूनही ग्राहक फुले खरेदी करत असल्याचे बाजारात दिसून येत आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य भाविकांचे बजेट मात्र कोलमडले आहे.