Saturday, September 20, 2025

सूर्याचे प्रकाशस्तंभ कसे असतात?

सूर्याचे प्रकाशस्तंभ कसे असतात?

कथा : प्रा. देवबा पाटील

आदित्य, सुभाष व त्यांचे मित्रमंडळ रोजच्यासारखे शाळेच्या मधल्या सुट्टीत निंबाच्या झाडाच्या गार छायेत आपले डबे खात असताना रोजच्यासारखी त्यांची सूर्याज्ञानाबद्दल चर्चा सुरू झाली. “दादा, तुम्ही सूर्याच्या प्रकाशस्तंभाबद्दल काही ऐकले आहे का?” सुभाषने विचारले. “नाही.” सगळे एकसाथ म्हणाले. सुभाष सांगू लागला, “तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केल्यास नुकताच उगवत असणा­ऱ्या किंवा मावळतीच्या अंतिम स्थितीत असणा­ऱ्या सूर्याच्या डोक्यावर सूर्याच्या रंगाचेच प्रकाशाचे उभे पट्टे दिसतात, त्यांना प्रकाशस्तंभ म्हणतात. ते कधीकधी तिरपेही असतात किंवा पिसा­ऱ्यासारखेही दिसतात. तसेच ते सूर्याच्या खालच्या बाजूला सुद्धा असतात पण वरच्या प्रकाशस्तभांपेक्षा थोडेसे लहान व अरुंद असतात.” “पण सूर्याभोवती ते प्रकाशस्तंभ कशामुळे निर्माण होतात?” आदित्यनेच विचारले. सुभाष म्हणाला, “ढगांमध्ये बर्फाच्या बारीक बारीक चकत्या किंवा तबकड्या क्षितीज समांतर अक्षाभोवती सतत फिरत असतात. त्यांवरून प्रकाशकिरणांचे परावर्तन होते नि सूर्याभोवती प्रकाशस्तंभ निर्माण होतात.” “मित्रा, सूर्याचा विनाश कसा व केव्हा होईल?” हा प्रश्न पिंटूने विचारला. “ सूर्यामध्ये सदैव हायड्रोजन व हेलियम या त्याच्या दोन्ही घटकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होत असते. या प्रक्रियेमध्ये हायड्रोजनचे सतत हेलियममध्ये रूपांतर होत असते. या रासायनिक प्रक्रियेतूनच सूर्यावर उष्णतारूपी अतिशय शक्तिशाली ऊर्जाशक्ती उत्पन्न होत असते. हीच ऊर्जाशक्ती सूर्यमालेतील सर्व ग्रह व त्या ग्रहांच्या सा­ऱ्या उपग्रहांना मिळत असते. सूर्यावर सतत घडणाऱ्या या रासायनिक प्रक्रियांमुळे सूर्यावरील हायड्रोजनही हळूहळू कमीकमी होत आहे. शेवटी एक वेळ अशी येईल की सूर्यामधील हायड्रोजन पूर्णपणे संपून जाईल व सूर्याचा नाश होईल. त्याचवेळी त्याच्या केंद्राभोवती असलेल्या भागात अणुप्रक्रिया सुरू होऊन त्याच्या आजूबाजूच्या भागात भयंकर प्रमाणात ऊर्जा निर्माण होईल. त्या ऊर्जेच्या उष्णतेने तो खूप मोठ्या प्रमाणात प्रसरण पावेल व त्याचा एक महाकाय आकाराचा भयंकर तांबडा राक्षसी तारा बनेल. त्याचाही आकार प्रचंड वाढत जाऊन तो शंभर पट मोठा होईल. त्याची उष्णता महाभयंकर वाढेल नि त्या प्रचंड तापमानाने सूर्याच्या सर्व ग्रह-उपग्रहांचा व आपल्या पृथ्वीचासुद्धा शेवट होईल. अर्थात सूर्याच्या या विनाशाला अजून पुढील अब्जावधी वर्षे लागतील. त्यामुळे आपणास भीती बाळगण्याचे वा काळजी करण्याचे काहीच कारण नाही.” सुभाषने सांगितले. “सूर्याची नावे व त्यांचा अर्थ तुला माहीत आहे काय?” असा प्रश्न चिंटूने विचारला. “ते काही मला माहीत नाही.” सुभाष उत्तरला. “मला माहीत आहेत ती नावे.” आदित्य म्हणाला व त्याने सांगण्यास सुरुवात केली. “ती नावे मित्र, रवि, सूर्य, भानू, खग, पूषण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सविता, अर्क व भास्कर ही आहेत.” “मग या नावांचे अर्थ तुला माहीत आहे का दादा?” सुभाषने विचारणा केली. “हो.” “मित्र” म्हणजे जगन्मित्र अर्थात संपूर्ण जगाला ख­ऱ्या मित्रासारखे सदैव सहाय्य करणारा, मरणापासून रक्षण करणारा व जीवन देणारा असा सर्व जगाचा मित्र. “रवि” हा सर्वांनी स्तवन केलेला असा शब्दांचा प्रवर्तक आहे व स्फूर्ती देणारा आहे. “सूर्य” म्हणजे प्रेरक व संचालक अर्थात तोच सर्वांना प्रेरणा देतो व त्याच्यामुळेच हे जग चालत आहे. तो नसला तर काहीच होणार नाही. “भानू” शब्दाचा अर्थ ओज व तेज देणारा असा होतो. तोच प्रकाश देतो. आकाशात संचार करणारा म्हणजे “खग” की जो सर्व इंद्रियांना शक्ती देतो. “पूषण” म्हणजे वृद्धी करणारा, पोषण करणारा असा अर्थ होतो. “हिरण्यगर्भ” म्हणजे ज्याच्या गाभ्यात हि­ऱ्यासारखे तेज आहे असा वीर्यबलदायक. “मरीच” म्हणजे रोगराई व पापांचा नाश करणारा. “आदित्य” म्हणजे सर्वांना स्वातंत्र्य व सुख देणारा. “सविता” म्हणजे सर्वकाही उत्पन्न करणारा असा उत्पादक. “अर्क” शब्दाचा अर्थ सर्वांना पूजनीय असणारा, मनामध्ये पूज्यभाव निर्माण करणारा. “भास्कर” म्हणजे प्रकाशक, कांतीदायक अर्थात सर्व जगाला प्रकाशमान करणारा व सजीवांना कांती देणारा.” आदित्यने सूर्याच्या बाराही नावांचे अर्थ सांगितले. “दिनकर, प्रभाकर अशीही सूर्याचीच नावे आहेत ना दादा.” सुभाषने विचारले. “आपल्या वेदांनुसार सूर्याला एकशेआठ नावे आहेत. प्रत्येक नावाचा एक विशिष्ट असा अर्थ आहे. दिनकर म्हणजे जो आकाशात दिवसभर प्रवास करतो तो आणि प्रभाकर म्हणजे जो आपल्या प्रभेच्या करांनी अर्थात प्रकाशकिरणांनी सकाळी नभ उजळवून टाकतो तो.” आदित्यने सांगितले. तो असे सांगत असतांनाच मधली सुट्टी संपल्याची शाळेची घंटा झाली.

Comments
Add Comment