जालना: मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात सदावर्ते यांना काहीच दुखापत झाली नाही, केवळ त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले असून, यामध्ये मनोज जरांगे पाटील समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक भाषेत मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतला होता. तसेच त्यांनी मुंबईतील मराठा आंदोलनालाही तीव्र विरोधच केला होता. सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी असंवैधानिक असल्याचे म्हणत सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध केला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांचा त्यांच्याविषयीचा रोष अनेक दिवसांपासून खदखदत होता, जी आज हल्ल्याच्या रूपात बाहेर आला.
यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना देखील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यावेळी सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा मराठा आंदोलकांद्वारे फोडण्यात आल्या होत्या.