नवी दिल्ली: स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ५० चेंडूत शतक पूर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी ती जगातील दुसरी महिला फलंदाज ठरली आहे. यासोबतच, मानधनाने भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रमही केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज शनिवारी, २० सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने फलंदाजीत शानदार कामगिरी केली. मानधनाने ६३ चेंडूत १२५ धावा केल्या, ज्यात १७ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. मात्र तिच्या या चमकदार खेळीचा फायदा विजयासाठी होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी विजय मिळवत ही मालिका २-१ अशी आपल्या खिशात घातली.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ ४७ षटकांत ३६९ धावांतच गारद झाला. भारताने सामना गमावला असला तरी त्यांनी सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या सामन्यात एकूण ७८१ धावा झाल्या.
भारतीय फलंदाजाचे सर्वात जलद शतक
आजच्या सामन्यात मानधनाने स्वतःचाच विक्रम मोडला. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात मानधनाचे हे सलग दुसरे शतक होते. भारताच्या दीप्ती शर्मा (७२ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (५२ धावा) यांनीही अर्धशतके झळकावली.
ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मेग लॅनिंगने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाच्या बाबतीत स्मृती मानधनाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या डावात ५७ चेंडूत शतक पूर्ण करणारी बेथ मुनी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.