नवी दिल्ली : या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपलं अवलंबित्व. आपण आत्मनिर्भर (स्वावलंबी) झालो तर या शत्रूवर आपण सहज मात करू शकतो. भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. खऱ्या अर्थाने आपला कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे आपले दुसऱ्या देशावरील अवलंबित्व. तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण सर्वांनी मिळून भारताच्या या शत्रूला पराभूत करुया. दुसऱ्या देशावरील अवलंबित्व नावाच्या या शत्रूला आपण पराभूत केलेच पाहिजे. कुठल्याही स्थिती आपल्याला त्यावर मात करावी लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२० सप्टेंबर) गुजरातमधील भावनगर येथे आयोजित एका रोड शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. त्यानंतर मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारताचा खरा शत्रू कोण आहे, हे सांगितले. त्यांचे हे वक्तव्य नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाची वार्षिक फी ही १ लाख डॉलर इतकी वाढवण्याच्या निर्णयाशी जोडून पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. खऱ्या अर्थाने आपला कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे आपले दुसऱ्या देशावरील अवलंबित्व. तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण सर्वांनी मिळून भारताच्या या शत्रूला पराभूत करुया. दुसऱ्या देशावरील अवलंबित्व नावाच्या या शत्रूला आपण पराभूत केलेच पाहिजे. कुठल्याही स्थिती आपल्याला त्यावर मात करावी लागेल.
परावलंबित्वामुळे देशाची अधोगती
मोदी म्हणाले, ‘आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहून चालणार नाही. आपण इतर देशांवर जितके अवलंबून राहू तितकी आपली अधोगती होत राहील आणि ते आपले खूप मोठे अपयश असेल. जगभरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशाला स्वावलंबी व्हावेच लागेल. आपण दुसऱ्या देशांचे आश्रित बनून राहिलो तर आपला आत्मसन्मान दुखावेल. १४० कोटी लोकसंखेच्या या देशाचे भविष्य आपण दुसऱ्या देशांच्या हाती सोपवू शकत नाही.’