मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने मढ येथे एक महागडे सीफेस अपार्टमेंट खरेदी केली आहे. मढ परिसर चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे . तसेच शांत आणि लांब समुद्रकिनारा असल्याने अनेक सेलिब्रिटींनी या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घराची किंमत ४. ७५ कोटी आहे . हे घर रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीच्या १५ व्या मजल्यावर असून, त्यामध्ये १,७०१ चौरस फूट कार्पेट एरिया आणि २०१ चौरस फूट डेक एरिया आहे. त्यामुळे एकूण क्षेत्रफळ १,९०० चौरस फूटांपेक्षा अधिक आहे. या व्यवहारासाठी त्याने २८.५० लाख रुपयांची मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, हा करार ११ जुलै २०२५ रोजी नोंदणीकृत झाला.
सिंगर जुबिन नौटियाल याचेही त्याच इमारतीत एक अपार्टमेंट आहे. टॉवरच्या ३४ व्या मजल्यावर चार बेडरूमची त्याची अपार्टमेंट आहे. त्याने डिसेंबर २०२४ मध्ये ही मालमत्ता ४.९४ कोटी रुपयांना खरेदी केली होती. याव्यतिरिक्त अभिनेता कार्तिक आर्यन, रोनित रॉय, आयुष्मान खुराना आणि चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांचीही याच परिसरात अपार्टमेंट्स आहेत.
संजय मिश्रा १९९५ पासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. ६१ वर्षीय या अभिनेत्याने २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अलिकडेच तो भूल भुलैया ३, भूल चुक माफ, सन ऑफ सरदार २ आणि हीर एक्सप्रेस या चित्रपटांमध्ये झळकला होता. घाशीराम कोतवाल या लोकप्रिय नाटकात देखील त्याने काम केले आहे.
या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत अनेक संकटांचा सामना केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की तो चित्रपटसृष्टी सोडून एका ढाब्यावर काम करू लागला होता. "मला एक गंभीर आजार झाला होता. त्यासाठी माझी सर्जरी देखील झाली. बरा झाल्यानंतर मी माझे वडील गमावले. मी माझे आयुष्य गमावू लागलो होतो. म्हणून, मी ऋषिकेशला गेलो आणि गंगा नदीच्या काठाजवळील एका ढाब्यावर काम करू लागलो. ढाब्याच्या मालकाने मला सांगितले की मला दिवसाला ५० कप धुवावे लागतील आणि मला १५० रुपये मिळतील.
२०२४ मध्ये, संजय मिश्राने लोणावळ्यातील तिसकारी गावात एक फार्महाऊस आणि एक शिवमंदिर बांधल्याची माहिती आहे. संजय मिश्रा याच्याकडे फॉर्च्युनर आणि बीएमडब्ल्यूसह अनेक आलिशान कार देखील आहेत.