आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात मधुमेह ही एक झपाट्याने वाढणारी आणि दीर्घकालीन परिणाम करणारी आरोग्य समस्या बनली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही समस्या पूर्णपणे बरी होणे शक्य नसले तरी, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायामाच्या सहाय्याने ती प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकते. विशेषतः योगासने हा मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग मानला जातो.
या लेखाद्वारे आपण मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर ठरणाऱ्या ५ प्रभावी योगासनांविषयी जाणून घेणार आहोत. ही आसने दररोज केल्यास टाइप २ मधुमेहावर चांगला परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया ही योगासने कोणती आहेत आणि ती कशी करावीत:
१) धनुरासन
पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करणारे हे आसन.
कसे करावे:
पोटावर झोपा
पाय वाकवून घोट्यांना धरावे
छाती आणि मांड्या वर उचलून शरीर धनुष्याच्या आकारात आणावे
काही वेळ राहून हळूवार मूळ स्थितीत या
२) मांडूकासन
या आसनाद्वारे पोटावरील दाब वाढून अग्नि संचार सुधारतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
कसे करावे:
वज्रासनात बसा
मुठी बंद करून नाभीजवळ ठेवा
श्वास सोडताना वरच्या शरीराला पुढे झुकवा
४-५ वेळा ही क्रिया करा
३) अर्धमत्स्येंद्रासन
पचन सुधारण्यासोबतच रक्तप्रवाह सुरळीत ठेवणारे आसन.
कसे करावे:
पाय पुढे सरळ ठेवून बसा
एक पाय वाकवून दुसऱ्या गुडघ्यावर आणा
कमरेपासून शरीर वळवा आणि हाताच्या सहाय्याने पाय धरा
दोन्ही बाजूंनी ४-५ वेळा करा
४) पश्चिमोत्तनासन
नाभीपासून खालील भागातील रक्तप्रवाह सुधारतो आणि पचनशक्ती वाढते.
कसे करावे:
पाय सरळ ठेवून बसा
श्वास सोडून पुढे वाका
हातांनी पायाचे बोटे धरा आणि कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा
१ ते २ मिनिटे राहून परत या
५) हलासन
थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करून मधुमेह नियंत्रणात ठेवणारे आसन.
कसे करावे:
पाठीवर झोपा, हात शेजारी ठेवा
पाय ९० अंशावर उचला
नंतर पाय डोक्याच्या मागे नेऊन बोटांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा
३० सेकंद थांबा आणि परत या
ही योगासने नियमितपणे केल्यास केवळ मधुमेहाच नव्हे तर संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारू शकतं. मात्र, कोणतीही नवीन व्यायाम योजना सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ही योगासने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि दीर्घकालीन उपाय ठरू शकतो.