नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक आयोगाने जोरदार फेटाळून लावला आहे. राहुल गांधींनी केलेला हा आरोप पूर्णपणे "चुकीचा आणि निराधार" असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही नागरिकाला 'ऑनलाइन' पद्धतीने मतदार यादीतून नाव वगळण्याचा अधिकार नाही. कोणताही मतदार वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला सुनावणीची संधी दिली जाते, त्यानंतरच आवश्यक ती प्रक्रिया केली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आयोगाने नमूद केले.
आळंद मतदारसंघाची वस्तुस्थिती
आळंद मतदारसंघात ६,००० हून अधिक मतदार वगळले गेल्याचा राहुल गांधींचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने याआधीच्या प्रकरणांचा हवाला देत सांगितले की, २०१३ मध्येही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने आळंद मतदारसंघाच्या इतिहासाची माहिती दिली. २०१८ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे सुभाष गुट्टेदार विजयी झाले होते, तर २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले होते. राहुल गांधींच्या आरोपावर आयोगाने सविस्तर स्पष्टीकरण देऊन हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.