अ व्यक्ती जीवंत नाही अशी तक्रार ब व्यक्तीच्या नावे क व्यक्ती करते. ही क व्यक्ती कोणाला दिसत नाही की माहिती नाही. पण या तक्रारींची दखल घेऊन नावं गायब केली जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अ आणि ब व्यक्तींना मंचावर येऊन बोलायला परवानगी दिली. पण क व्यक्तीबाबत कोणाताही ठोस साक्षी - पुरावा अद्याप निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. यामुळे आधीच्या आरोपांसारखेच नवे आरोप बिनबुडाचे ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माझं देशावर, संविधानावर आणि लोकशाहीवर प्रेम आहे; असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस समर्थक मतदारांचीच नावं मतदारयादीतून गायब केली जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. याच कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातून सहा हजार १८ मतं गायब करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नावं गायब करण्याचं काम एक वेगळी शक्ती करत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा दावा करताना त्या शक्तीबाबतचा ठोस पुरावा सादर करणे टाळले.