Wednesday, September 17, 2025

काँग्रेसला हाय कोर्टाचा दणका! पंतप्रधानांच्या आईचा AI व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे दिले आदेश

काँग्रेसला हाय कोर्टाचा दणका! पंतप्रधानांच्या आईचा AI व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे दिले आदेश

पाटणा: पाटणा उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचे चित्रण करणारा एआय व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर आधारित AI व्हिडिओ बनवल्याबाबत काँग्रेस पक्षाच्या विरोधात आज पाटणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली.  न्यायालयाने काँग्रेस पक्षाला हा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे.

पाटणा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पी.बी. बजंत्री यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा अपमान करणारा हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. १० सप्टेंबर रोजी, बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईचे एआय-आधारित चित्रण दाखवले आहे. 

या वादग्रस्त व्हिडिओमध्ये, दिवंगत हिराबेन मोदी यांचे पात्र राजकीय फायद्यासाठी त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्या मुलाला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना  फटकारताना दिसत आहे. भाजपने या व्हिडिओचा तीव्र विरोध केला असून, हा मोदींच्या आईचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या व्हिडिओविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली.

भाजपने एफआयआर दाखल केला

भाजपने आपल्या तक्रारीत दावा केला की, हा व्हिडिओ केवळ पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करत नाही तर एका दिवंगत महिलेच्या प्रतिमेचे देखील उल्लंघन करत आहे. भाजप कार्यकर्ते संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली काँग्रेस नेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. एफआयआरमध्ये व्हिडिओ पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईची प्रतिमा मलिन करणारा असल्याचे वर्णन केले आहे.

काँग्रेसकडून बचाव

काँग्रेस पक्षाने संबंधित व्हिडिओबद्दल आपली बचावात्मक बाजू मांडली आहे.  पक्षाचे मीडिया प्रमुख पवन खेरा म्हणाले, "या व्हिडिओत कोणाचाही अपमान केला जात नाहीय. आई तिच्या मुलाला फक्त राजधर्माची तत्वे शिकवत आहे; जर पंतप्रधानांना तो आक्षेपार्ह वाटला तर ती त्यांची समस्या आहे." असे असले तरी आता पटणा उच्च न्यायालयाने सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आलेला हा AI व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले असल्यामुळे, काँग्रेसची चांगलीच मुस्कटदाबी झाली आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >