दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या आधी पाकिस्तान संघाची नाटकं पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होण्याच्या एक तास आधी पाकिस्तानी मीडियाने दावा केला होता की पाकिस्तान यूएईसोबत सामना खेळणार नाही.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी संघ स्टेडियमच्या दिशेने निघाला आहे. पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे रेफ्री अँडी पॉयक्राफ्टच असतील.
अँडी पॉयक्राफ्ट यांना पदावर कायम ठेवल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. आयसीसीने या सामन्यासाठी मॅच रेफ्री अँडी पॉयक्राफ्ट यांना हटवण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची काहीच नाटकं चालली नाहीत.
याआधी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शेकहँड न झाल्याने चांगलाच वाद सुरू आहे. यादरम्यान, पाकिस्तानने आयसीसीसमोर दोन मागण्या ठेवल्या होत्या. एक म्हणजे भारत-पाकिस्तान सामन्याचे रेफ्री अँडी पॉयक्राफ्ट यांनी माफी मागावी आणि दुसरी मागणी अशी की टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला दंड ठोठावला जावा. कारण त्याने पहलगाम हल्ल्याबाबत बोलत याला राजकीय रूप दिले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास नकार दिला होता. पाकिस्तानी संघाने यासाठी मॅच रेफ्री अँडी पॉयक्राफ्ट यांना जबाबदार ठरवले होते. पॉयक्राफ्ट यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र आयसीसीने त्यास नकार दिला होता. यानंतर असे बोलले जात होते की पाकिस्तान यूएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतो.