
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. युवराजला २३ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे युवराजच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने वन एक्स बेट या बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा , बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनाही समन्स बजावले आहे. रॉबिनला २२ सप्टेंबर, युवराजला २३ सप्टेंबर, तर सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना, अभिनेत्री उर्वीशी रौतेला यांची बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने चौकशी केली आहे.
ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1xBet, फेअरप्ले, पॅरीमॅच आणि लोटस365 यासारख्या बंदी घातलेल्या बेटिंग प्लॅटफॉर्मशी असलेल्या प्रचारात्मक संबंधांच्या चौकशीचा भाग म्हणून क्रिकेटपटू आणि कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. गुंतवणूकदार आणि जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर सट्टेबाजीची चौकशी ईडी करत आहे. पैशांची अफरातफर झाली आहे का ? याचाही तपास ईडी करत आहे.