‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो अपलोड करून त्याला ‘रेट्रो एआय’ स्टाईलमध्ये एडिट करत आहेत आणि लगेचच ते फोटो फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अशा प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. या नव्या ट्रेंडची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, जवळपास प्रत्येकजण आपला किंवा ओळखीच्यांचा एआय फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतोय. एआयने बनवलेले हे फोटो पाहून लोक इतके प्रभावित झाले आहेत की, ते कोणताही विचार न करता आपले फोटो धडाधड अपलोड करत आहेत. मात्र, या मोहात पडून युजर्स आपली खासगी माहिती किती सहजपणे शेअर करत आहेत, याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. त्यामुळेच एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, अशा ॲप्सच्या मोहात अडकताना आपण आपल्या डेटाची सुरक्षा धोक्यात घालत आहोत आणि त्यामुळे भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस गाजत चालली आहे. या ...
IPS सज्जनार यांचा इशारा
आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वरून एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलंय की, इंटरनेटवरील ट्रेंड्सच्या मोहात अडकताना सावधगिरी बाळगली नाही, तर गंभीर धोके संभवतात. त्यांनी खासकरून ‘नॅनो बनाना’ सारख्या ट्रेंडिंग क्रेझबद्दल इशारा देताना लिहिलं की, अशा मोहाला बळी पडून आपली खासगी माहिती ऑनलाइन शेअर करणं धोकादायक आहे. यामुळे आपण सहजच सायबर स्कॅममध्ये अडकू शकतो. अगदी एका चुकीच्या क्लिकमुळे तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे सरळ गुन्हेगारांच्या हाती पोहोचू शकतात. सज्जनार यांनी नागरिकांना सल्ला दिला आहे की, कधीही फेक वेबसाइट्स किंवा अनधिकृत अॅप्सवर आपले फोटो किंवा वैयक्तिक माहिती अपलोड करू नये. सोशल मीडियावर आनंदाचे क्षण शेअर करणं चुकीचं नाही, पण त्या प्रक्रियेत डेटा सिक्युरिटीला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं.

“तुमचा डेटा, तुमचे पैसे – तुमची जबाबदारी!
आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी सोशल मीडियावरील ट्रेंड्सच्या आहारी जाऊ नका असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिलंय –
“ट्रेंड्स येतात आणि जातात. पण एकदा का तुमचा डेटा फेक किंवा अनधिकृत वेबसाइटवर गेला, तर तो परत मिळवणं जवळपास अशक्य होतं. जसं अनोळखी रस्त्यावर चालताना खड्ड्यात पडण्याची शक्यता असते, तसंच इंटरनेटवर बेपर्वा वागणं धोकादायक आहे. आपले फोटो किंवा खासगी माहिती अपलोड करण्यापूर्वी दोनदा विचार करणं आवश्यक आहे. कारण तुमचा डेटा आणि तुमचे पैसे ही तुमचीच जबाबदारी आहे.” यासोबतच सज्जनार यांनी काही बातम्यांचे स्क्रिनशॉट्स शेअर केले, ज्यात ‘नॅनो बनाना’ ट्रेंडमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचं स्पष्ट दिसतं. त्यामुळे त्यांनी लोकांना सजग राहण्याचं आणि आकर्षक ट्रेंड्सच्या मागे धावताना स्वतःचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. या आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्या पोस्टमध्ये विविध लोकांना आणि प्रोफाइल्सनाही टॅग केलंय. यामध्ये पंतप्रधानांचं कार्यालय, द इंडियन सायबरक्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तेलंगणा पोलीस यांचाही समावेश आहे.