डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील प्रसिद्ध पर्यटक क्षेत्र सहस्त्रधारेमध्ये काल रात्री उशिरा आस्मानी संकट कोसळलं. निसर्गाचे नंदनवन असलेल्या या क्षेत्राचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक दुकाने, गाड्या आणि घरे एखाद्या खेळण्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे दिसून आले. ज्यात दोनजण बेपत्ता असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी सविन बन्सल यांनी रात्रीच सूत्रे हाती घेतली. त्यांनी तातडीने विविध विभागांशी संपर्क साधून बचाव पथके घटनास्थळी पाठवली. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस दल जेसीबी व इतर उपकरणांसह बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. रात्रीच परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. देहरादूनमधील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती आताही कायम आहे. मालदेवता परिसरात सोंग नदीला पूर आला आहे, ज्यामुळे काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स ढिगाऱ्याखाली आणि पाण्याखाली गेली आहेत. देहरादूनच्या मोहनी रोड, पूरण बस्ती, बलबीर रोड, भगतसिंग कॉलनी आणि संजय कॉलनीसारख्या भागात पावसाचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये घुसले आहे. अधोईवाला आणि अप्पर राजीवनगरमध्ये वीज ट्रान्सफॉर्मर वाहून गेल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केले दुःख
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "डेहराडूनच्या सहस्त्रधारा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही दुकानांचे नुकसान झाल्याचे वृत्त समजले. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि पोलीस पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. मी स्वतः स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो," असे ते म्हणाले.