डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार उडाला आहे. शहराच्या सहस्त्रधारा भागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने मोठे नुकसान केले आहे. या घटनेत दोन जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि पोलिस दलाकडून बचाव मोहीम सुरू आहे.
रात्री उशिरा अचानक झालेल्या ढगफुटीमुळे ऋषिकेशमध्ये आज सकाळी चंद्रभागा नदी तुफान वाहत आहे. नदीचे पाणी हायवेपर्यंत पोहोचले आहे. चंद्रभागा नदीत अडकलेल्या तीन जणांना एसडीआरएफ टीमने रेस्क्यू केले.
जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगारे हटवण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जात आहे. बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूर आलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
खबरदारी म्हणून डेहराडून जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातल्या इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची दखल घेतली आहे. ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि मदतकार्यासाठी आवश्यक सूचना देत आहेत. ही ढगफुटी उत्तराखंडमध्ये यावर्षी झालेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात उत्तरकाशीमध्येही ढगफुटी झाली होती, ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.