‘दीनदुबळ्यांच्या शिक्षिका’

नुकताच पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या काळात दानाचे विशेष महत्त्व आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. आजच्या आपल्या कर्तृत्ववान राज्ञी ‘विद्याताई धारप’ २००७ सालापासून कचरा वेचक मुलांसाठी, महिलांसाठी, हातावर पोट भरणाऱ्या समाजासाठी समर्पित भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत करत आहेत. चला तर मग आज आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया.


उपजतच संघ परिवाराचे बाळकडू लाभलेल्या विद्या ताईंचा जन्म हा साहित्यिक वारसा लाभलेल्या वाई गावचा. माहेरचे नाव प्रमिला माधव घोटवडेकर. चार बहिणी आणि तीन भाऊ अशा समृद्ध कुटुंबातील विद्याताई महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या शाळेत मॅट्रिकमध्ये पहिल्या आल्या. पुढे त्यांनी कला शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; परंतु त्या काळात छोट्याशा गावात फारशी उपलब्धता नसल्याने आणि त्यांची बहीण भावंडं ठाण्यातच राहत असल्याने त्या मुंबईला प्रथम मामाकडे राहिल्या. बॉम्बे पोर्टस् इथे दोन वर्षे आणि नंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया इथे सलग ३१ वर्षे त्यांनी नोकरी केली.


बॉम्बे पोर्टस् मध्ये नोकरी करत असतानाच त्यांचे लग्न झाले व त्या कल्याणला स्थायिक झाल्या. सासरही त्यांना संघ परिवाराच्या विचारांचे मिळाले. त्यामुळे नोकरी करत असताना त्यांचे विविध पैलू त्यांना जोखायला मिळाले. त्यांची बहीण म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका सुनंदाताई पटवर्धन यांचा आदर्श त्यांच्या समोर होताच. त्यामुळे बँकेत असताना सलग २५ वर्षे ट्रेनमधून व ऑफिसमधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसाठी भाऊबीज निधी संकलन केले, भारतीय मजदूर संघ यांच्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेतील स्टाफ वर्कर्स कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये डायरेक्टर व असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले, वनवासी कल्याण आश्रमासाठी निधी संकलन, तसेच मराठी माध्यमाच्या शालेय पुस्तकांचे संकलन, एका गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी मदत करणाऱ्या मैत्रिणीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मदत गोळा करून चार ते पाच वर्षं त्या मुलाला त्यांनी आर्थिक मदत केली. अशा पद्धतीचे समाजकार्य त्यांचे नोकरीसोबत चालूच होते.


२००१ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जुलै २००७ पासून कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड येथे कचरा वेचक मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू केला. डम्पिंगला लागून असलेली वस्ती म्हणजे गलिच्छ परिसर, सर्वत्र घाण, कुबटवास, उंदीर, घुशी, डास यांचे साम्राज्य रोज घरातील वस्तीतील भांडणे व्यसनाधीनता या सगळ्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेच्या आशेचा किरण घेऊन विद्याताई अत्यंत जिद्दीने तिथल्या मुलांना शिकवण्याचे कार्य करत राहिल्या. त्यांनी मुलांना मुळाक्षरे, बाराखडी व अंक शिकवण्यास सुरुवात केली. पुस्तकावरून पाहून सर्वांना लिहिता येत असे, परंतु वाचनाचा त्यांना काहीच गंध नव्हता. अक्षर, अंक ओळख नाही अशा मुलांना शिकवताना त्यांच्या शैक्षणिक इयत्ता व त्यांचे वय हे बाजूला ठेवून त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांचा पाया भक्कम करणे हे फार महत्त्वाचे वाटले. हळूहळू त्या मुलांमध्ये त्यांना आत्मविश्वास जाणवू लागला. मुलांसोबतच तिथल्या काही महिला सुद्धा त्यांच्याकडे शिकायला येत. साईबाबा मंदिरातील जागेत एक आजीबाईंही शिकल्या व त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ती आळंदीला समर्पित केली.


सात वर्षे सलग क्लास घेऊन मुलांना शिक्षणाची गोडी लावली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. कासवाच्या गतीने का होईना प्रगती होत होती पण ती वस्ती आता उंबर्डे येथे स्थलांतरित झाल्याने त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याणमधील शशांक शाळेत क्लास सुरू केला. वाडेघर, सुभाष नगर, महाराष्ट्र नगर, चंदनशिवेनगरमधील मुलांसाठी की ज्यांना क्लास लावायला परवडत नाही अशांसाठी तो क्लास आता फडके मैदाना समोरील साईबाबा मंदिरात वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये घेतला जातो. सध्या क्लाससाठी सकाळी दहा ते अकरा व दुपारी चार ते सहा या वेळेत दहा ते पंधरा मुलांना शिकवले जाते तसेच ही जागा लहान पडते म्हणून मंदिरासमोरील विघ्नहर सोसायटीमध्ये दोन्ही वेळेला क्लास घेतला जातो. जवळजवळ ५० ते ६० मुले पहिली ते दहावीमधील आहेत व १६ ते १८ शिक्षकांच्या सहकार्याने पूर्णपणे निःशुल्क असा हा क्लास चालवला जातो. या क्लासमधून शिकणाऱ्या मुलांपैकी आत्तापर्यंत काही मुले पदवीधर झाली आहेत, काही एमपीएससीचा अभ्यास करत आहेत, दोन-चार विद्यार्थी आयटीआय करत आहेत, काही विद्यार्थिनी तेरावी पास होणार आहेत, चार मुली बारावी सायन्सला आहेत. कधी जागेचा, कधी मानसिकतेचा, कधी मनुष्यबळाचा अशा अनेक आव्हानांना वेळोवेळी तोंड देत त्यांनी त्यांची वाटचाल चालू ठेवली आणि या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी वेळोवेळी देव माणसंही त्यांना भेटत गेली.


त्यांचे हे निस्सीम कार्य बघून अनेक सरकारी संस्थांनी व व्यक्तींनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यामधील महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार, आरएसएसतर्फे पवित्र पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्तही त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामधील उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे याज्ञवल्क्य संस्थेतर्फे कै. सुशीलाबाई एकलहरे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. गोपाळ नगर (डोंबिवली) गणेशोत्सव मंडळातर्फे देखील त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत ज्या काही पुरस्कारांच्या रकमा मिळाल्या त्या सगळ्या रकमेचा उपयोग त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठीच केला. तसेच मुलांना मुंबई दर्शन, नेहरू तारांगण दाखवणे, त्यांना सहलीला घेऊन जाणे, जादूचे प्रयोग दाखवणे असे आगळे वेगळे उपक्रम देखील ह्या मुलांसाठी राबविले. त्यांचा प्रामाणिकपणा, सातत्य, जिद्द ही खरंच सगळ्यांसाठीच अनुकरणीय अशी आहे.


कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी टीमवर्क हे खूप महत्त्वाचे असते. या संपूर्ण समूहाचे काम ‘सरस्वती ग्रुप’या माध्यमातून चालते. सरस्वती ग्रुपमधील प्रत्येक शिक्षक विद्याताईंसोबतचे हे ज्ञानदानाचे कार्य असेच पुढे निरंतर चालू ठेवणार आहे. नोकरीसोबतच आपल्याला जे काही समाजासाठी करता येईल ते करत राहणं याचे उत्तम संस्कार विद्याताईंनी त्यांच्या तिन्ही मुलांवर देखील घडवले. त्यांची एक मुलगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सक्रिय प्रमुख कार्यकर्ती आहे. आपले दैनंदिन आयुष्य जगताना आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींसाठी किंवा समाजातील वंचित लोकांसाठी आपल्या शिक्षणाचा मदतीचा हात देण्याचा मोलाचा सल्ला विद्याताई सगळ्यांना देतात.


कचरा वेचक, हातावर पोट असणाऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या विद्याताईंचे कार्य हे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असे आहे. डम्पिंग ग्राउंडसारख्या दुर्गंधीयुक्त ठिकाणी जाऊन नि:स्वार्थपणे ज्ञानदान करणाऱ्या या सरस्वती मातेला शतशः प्रणाम आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!

Comments
Add Comment

नवरात्रीत थिरकणार रंगीबेरंगी घेर!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणानंतर आता तरुणाईला सर्वाधिक भुरळ घालणारा उत्सव

गर्भधारणेदरम्यान अल्ट्रासाऊंडचे महत्त्व

गर्भधारणेचा प्रवास हा आईसाठी आणि कुटुंबासाठी आनंददायी तसेच संवेदनशील काळ असतो. या काळात गर्भाची उत्तम वाढ,

गणेशोत्सवात पैठणी सिल्कचा डौल!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात घराघरांत आनंदाचं वातावरण असतं. बाप्पाची आराधना,

गर्भावस्थेत चंद्रग्रहण : गैरसमज व योग्य काळजी

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा

मानसशास्त्रातील मानाचे पान

वैशाली गायकवाड मानसिक आरोग्य या संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉ. शुभा

पातंजल योगाचं नैतिक अधिष्ठान : यम आणि नियम

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण पातंजल योगातील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान,